कणकवली : चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या तारखा अनेकदा विविध राजकीय व्यक्तींकडून जाहीर झाल्या आहेत. मात्र, अजूनही विमानतळाचे उदघाटन झालेले नाही. त्यामुळे तारखेंचा हा खेळ करीत जनतेची चाललेली चेष्टा थांबवा. पहिल्यादा केंद्रीय उड्डाण समितीची परवानगी घा आणि त्यानंतरच उदघाटनाची तारीख जाहीर करा, असे आवाहन केंद्र व राज्य शासनातील सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांना मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केले आहे. कणकवली येथे मनसे संपर्क कार्यालयात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी परशुराम उपरकर म्हणाले, जिल्ह्यातील सध्याच्या भाजपा खासदारांनी महसूलमंत्री, उद्योगमंत्री तसेच पालकमंत्री असताना अनेकदा चिपी विमानतळाच्या ठिकाणी दगडी पाटी लावत त्यावर आपली नावे कोरली. तर शिवसेनेच्या तत्कालीन पालकमंत्र्यांनी गणेश चतुर्थी दरम्यान गणेश मूर्ती आणत विमान उतरवले. शिवसेनेच्या आताच्या खासदारांनी पुन्हा एकदा १ मार्चला विमानतळाचे उद्घाटन करण्याचे जाहीर केले होते. पण अद्याप उद्घाटन होवू शकलेले नाही. ही एकप्रकारे राज्यकर्त्यांनी जनतेची चेष्टा चालवली आहे.मनसेच्यावतीने आम्ही यापूर्वीच पुढील दोन ते तीन महिने विमानतळ सुरू होणार नाही असे सांगितले होते. १ मार्चला केंद्रीय उड्डाण समिती विमानतळाची पाहणी करायला आली. त्यांनी तिथे त्रुटी आहेत असे सांगितले.
सध्याच्या मुख्यमंत्र्यांनीही उदघाटनाची तारीख जाहीर केली होती. पण अद्याप विमानतळ चालू झालेला नाही. सध्याचे शिवसेना खासदार भाजपच्या खासदारांना नरकासूर असे यापूर्वी म्हणत होते.पण अलीकडेच एका कार्यक्रमात ते त्यांना आदरणीय असे म्हणाले आहेत. त्यामुळे आता या दोन्ही खासदारांनी चिपी विमानतळ लवकर सुरू होण्यासाठी एकत्र यावे.
विमानतळासाठी अवघ्या १५० रुपये गुंठ्यानी जमीन दिलेल्या लोकांना तिथे विमान उतरल्याचे पाहूण समाधान मिळेल . यासाठी प्रयत्न करावे. सत्ताधारी शिवसेना खासदारांनी कुडाळ येथे महिलासाठी रुग्णालय सुरू होणार असल्याची अनेकदा घोषणा केली. मात्र , अद्याप ते रुग्णालय सुरु झालेले नाही. असेही परशुराम उपरकर यावेळी म्हणाले.