कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणारी अवैध वाळू वाहतूक रोखण्यात यावी , अशी मागणी स्वराज्य ट्रक चालक - मालक संघटनेच्या माध्यमातून एका निवेदनाद्वारे सिंधुदुर्ग जिल्हा उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.या निवेदनात म्हटले आहे की, 'स्वराज्य ट्रक चालक - मालक संघटना ही शासनमान्य आहे. सध्या जिल्ह्यातील ट्रक चालक -मालकावर कोरोनामुळे उपासमारीची वेळ आली आहे. त्यात बॅक, पतसंस्था, फायनान्स कंपनी यांनी वसुली सुरू केली असून ट्रक मालकांचा जीव अक्षरशः मेटाकुटीला आला आहे. परंतु या कठीण स्थितीत काही मुजोर ट्रक चालक- मालक वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसवून मालवाहू ट्रक मधून प्रमाणापेक्षा ओव्हरलोड वाळू (सिलिका) तसेच इतर मालाची वाहतूक करत आहेत.
या ओव्हर लोड वाहतुकीचा फटका साहजिकच इतर वाहन मालकांना होत आहे. त्यामुळे आमच्या संघटनेची आपणास विनंती आहे की , आपण या बाबतची गंभीर दखल घेऊन अनधिकृत माल वाहतुकीवर ब्रेक लावावा . ज्यामुळे नियमात रहाणाऱ्या वाहन चालक मालकांना याचा फायदा होईल. तसेच पुढील काही दिवसात आपल्याकडून कोणतीही कारवाई झाली नाही तर आम्ही व आमचे सभासद अवैद्य वाहतुकीची माहिती आपणास देऊ.
तसेच अशा मुजोर वाहनचालकांना रंगेहात आपल्या ताब्यात देऊ. ज्यात कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेबाबतचा प्रश्न निर्माण होणार नाही. त्याचप्रमाणे कोणत्याही पद्धतीत आमच्याकडून दोषी वाहन चालक तसेच मालकांकडून तडजोड शुल्कची आकारणी केली जाणार नाही.
आम्हाला याची खात्री आहे तसे झाल्यास व ते सिध्द झाल्यास आम्ही किंवा मालवाहू गाडी पकडणारा सभासद शिक्षेस पात्र असेल. मात्र पकडून दिलेल्या गाडीवर योग्य ती दंडात्मक कारवाई करण्याची जबाबदारी आपली राहील .असेही या निवेदनात म्हटले आहे. हे निवेदन संघटनेचे अध्यक्ष संजय नकाशे, सचिव दीपक घुगरे, खजिनदार रमेश मुणगेकर यांनी दिले आहे.