आरोंदा : आरोंदा तेरेखोल खाडीत बेकायदेशीर चालू असलेले ड्रेजींग व कोळसा वाहतूक रोखण्याची मागणी आरोंदा बचाव संघर्ष समिती (अस्थायी) चे उपाध्यक्ष विष्णू नाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे संघर्ष समितीच्यावतीने दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.आरोंदा येथील आरोंदा किरणपाणी पोर्ट लिमीटेड कंपनीकडून खाडी पात्रात ड्रेजींगचे काम सुरू झाले आहे. हे ड्रेजींग बेकायदेशीर शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून चालू आहेत. कारण या कंपनीने बांधलेल्या बेकायदेशीर जेटीबाबत आरोंदा बचाव संघर्ष समितीमार्फत हायकोर्ट मुंबई, राष्ट्रीय हरीतपट्टा लवाद पुणे व त्यांच्या मार्फत सर्वोच्च न्यायालयात कोर्टात दावे दाखल आहेत. असे असताना वरील कंपनी जेटी सुरू करण्याकरीता प्रयत्न सुरू करत आहे. ही कंपनी या तिन्ही न्यायालयांचा अवमान करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. यापूर्वी या मायनिंग जेटी विरोधात सन २०११ पासून संपूर्ण आरोंदावासियांचा शांतता व अहिंंसात्मक सनदशीर मार्गाने लढा सुरू आहे. आता पर्यंत तीन ग्रामसभामध्ये ही मायनिंग व कोळसा वाहून नेणारी जेटी नको अशा प्रकारचे ठराव पूर्ण बहुमताने झाले आहेत. त्याबाबतची संपूूर्ण माहिती आपल्या कार्यालयाकडे वेळोवेळी भेटून निवेदनाद्वारे दिलेली आहे. परंतु त्याची योग्य अशी दखल घेतली नाही. त्यामुळे कोर्टात दावे दाखल करावे लागले आहेत. या सर्व बाबी न्यायप्रविष्ठ असताना ड्रेजिंगचे काम कसे चालू राहते, असा प्रश्न जनतेला पडला आहे, असे निवेदनात म्हटले आहे. खाडीलगत असलेली साडेतीनशे मच्छिमार कुटुंबे देशोधडीला लागतील. ७०० एकर क्षेत्रातील असलेले शासनाने संरक्षित केलेले कांदळगाव नष्ट होऊन जैवविविधतेसह मत्स्यबिजाचे कायमस्वरूपी उच्चाटन होईल, असेही निवेदनात नमूद केले आहे. आरोंदा गाव सागरी पर्यटनाच्या नकाशावर अगक्रमावर आहे. यापूर्वी खाडीत सावित्री नावाची हाऊसबोट, विठ्ठलराव कामतांचे लोटस नावाचे हॉटेल होते. शेकडो पर्यटक आजही या खाडीकिनारी भेट देतात. त्यामुळे आरोंदा गाव हा पर्यटनगाव राहण्यासाठी बेकायदेशीर चाललेले ड्रेजिंग व कोळसा वाहतूक बंद व्हावी व आरोंदावायीयांना योग्य तो न्याय मिळावा, अशी विनंतीही या निवेदनात केली आहे. या निवेदननाची प्रत राष्ट्रीय हरीतपट्टा लवाद पुणे, यांनाही पाठवण्यात आली आहे. (प्रतिनिधी)आंबा, काजू धोक्यात : शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ या मायनिंग कोळसा वाहतूक करणाऱ्या जेटीमुळे आरोंदा गाव संकटात सापडला आहे. शेतकरी, बागायतदार, आंबा, काजू शेती, नारळबागा धोक्यात येणार आहेत. ड्रेजिंग खाडीच्या उगमाकडील समुद्रातील खडक फोडल्यास संपूर्ण आरोंदा, किनळे, तळवणे ही शेती बागायत क्षेत्रातील गावे खाऱ्या पाण्याच्या क्षेत्रात येतील आणि शेतकऱ्यांवर उपासमारीची पाळी येईल.
आरोंदा जेटीचे ड्रेजींग काम थांबवा
By admin | Published: November 09, 2015 10:54 PM