सावंतवाडी : येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या छप्पराच्या दुरुस्तीचे काम नव्याने करूनही रुग्णालयात छप्परगळती सुरूच आहे. रुग्णांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. तर रक्तपेढी विभागातही तलावाप्रमाणे पाणी साचत आहे. मात्र, संबंधित ठेकेदाराला याबाबत वारंवार सूचना करूनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने रुग्णालय व्यवस्थापनातर्फे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, रुग्णालयासारख्या महत्त्वाच्या ठिकाणचे ठेकेदाराने केलेले सदोष काम गंंभीर असून, त्याकामाची चौकशी करण्याची मागणी नगरसेवक सुधन्वा आरेकर यांच्यासह नागरिक व रुग्णांमार्फत करण्यात आली आहे. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीच्या छप्पराचे काम गेल्या एप्रिल महिन्यांपूर्वी करण्यात आले. मात्र, छप्पराचे काम अर्धवट करण्यात आले असून, केलेल्या कामातही त्रुटी निर्माण झाल्या आहेत. पहिल्याच पावसात छप्पर गळती होऊन थेट पावसाचे पाणी रुग्णालयात शिरते. रक्तपेढी विभागात भर पावसात धबधब्याप्रमाणे पावसाचे स्रोत वाहू लागतात. यामुळे रक्तपेढी विभागात तळ्याचे प्रतिबिंब पाहावयास मिळते. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना दररोज पावसाचे पाणी स्वत:हून साफ करावे लागत आहे.याबाबत बांधकाम विभाग व संबंधित ठेकेदार यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही कोणत्याही हालचाली तसेच कारवाई केली जात नाही. यामुळे रुग्णालयातर्फे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. रुग्णालयातील रुग्णांच्या बेडमध्येही गळती सुरू असल्याने भिजत रुग्णांना उपचार घ्यावे लागत आहेत. तर काही बेड रिकाम्य करण्यात आल्या आहेत. रुग्णालयात वारंवार गळतीमुळे साचलेल्या पाण्यामुळेच तर भविष्यात डासांची उत्पत्ती तर होणार नाही ना, अशा भीतीपोटी रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्णालयाला चारही बाजूने वेढलेल्या पाण्यामुळे रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे. यामुळे संबंधित ठेकेदाराच्या कामाची चौकशी करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)उपजिल्हा रुग्णालयाच्या नाल्याचे स्रोतही बंदरुग्णालयाच्या संरक्षक भिंतीजवळ नाल्यावर ठेकेदाराने चिरे टाकल्याने नाल्याचे स्रोत पूर्णत: बंद झालेले आहेत. याबाबत संबंधित ठेकेदाराला कळवूनही दुर्लक्ष करीत आहेत. यामुळे रुग्णालयाच्या आतील भागाबरोबर बाहेरील भागातही पाणीच पाणी साचत आहे.
दुरुस्तीनंतरही गळती थांबेना
By admin | Published: June 30, 2016 10:01 PM