कणकवली : येथील बसस्थानक परिसरात दुचाकी वाहनांसाठी सुरू करण्यात आलेली ‘पे अँड पार्क’ सुविधा बंद करण्यात यावी, तसेच स्वच्छतागृहाचा वापर महिलांसाठी मोफत असतानाही त्यांच्याकडून आकारण्यात येणारे मूल्य तत्काळ थांबवावे, अशी मागणी करीत कणकवली तालुका युवक काँगे्रसच्यावतीने एस.टी. आगार व्यवस्थापकांना मंगळवारी घेराव घालण्यात आला. तसेच या समस्यांबाबत जाबही विचारण्यात आला. हे प्रकार तातडीने बंद न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.येथील बसस्थानक परिसरात काही दिवसांपासून दुचाकी वाहनांसाठी ‘पे अँड पार्क’, योजना सुरू केली आहे. बसस्थानकाच्या आवारात लावण्यात येत असलेल्या दुचाकी वाहनांच्या मालकांकडून मूल्य आकारले जात आहे. मात्र, मूल्य आकारल्यानंतर पार्किंगमध्ये गाडी सुरक्षित राहणार का? तसेच वाहनांचे स्पेअरपार्ट वा पेट्रोल चोरीस गेल्यास जबाबदारी संबंधित स्वीकारणार का? अशा प्रश्नांचा भडिमार एसटीच्या अधिकाऱ्यांवर करण्यात आला. हा प्रकार न थांबल्यास युवक काँग्रेस तो बंद पाडील, असा इशाराही दिला.युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप मेस्त्री, गणेश तळगावकर, संदेश पावसकर, ओंकार मेस्त्री, प्रबोधन मठकर, योगेश चव्हाण, सलमान शेख, सोहेल खान, परेश कांबळी, तुषार पावसकर, गौरव साटम, नंदन काकडे, साई खानोलकर, आशिष कदम, भूषण कदम, राहुल कदम, चानी जाधव, आनंद तळवडेकर, आदी युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. (वार्ताहर)ठेकेदाराला विचारला जाबबसस्थानक परिसरातील सुलभ शौचालयात महिलांसाठी मोफत सुविधा असताना त्यांच्याकडून मूल्य आकारले जात आहे. पुरुषांकडून दोन रुपये घेणे आवश्यक असताना पाच रुपये आकारले जात आहेत. सुलभ शौचालयाबाहेर दरफलकही लावलेला नाही. याबाबतही ठेकेदाराला कार्यकर्त्यांनी जाब विचारला. युवक काँग्रेसच्या माध्यमातून दरफलक लावण्याचे निश्चित केले.
स्वच्छतागृहाद्वारे होणारी लूट थांबवा
By admin | Published: April 16, 2015 9:16 PM