आचरा : तत्कालीन तहसीलदारांनी बनवलेला चुकीचा फेरफार रद्द करून पूर्ववत करून देण्याची मागणी आचरा ग्रामस्थांनी वेळोवेळी केली होती. परंतु, याकडे शासन दुर्लक्ष करत असल्याने आचरा ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी आचरा तिठा चौकात रास्ता रोको आंदोलन छेडले. यावेळी पोलीस निरीक्षक महेंद्र शिंदे यांनी रास्ता रोको बेकायदेशीर असल्याचे सांगत सरपंच मंगेश टेमकर, जगदीश पांगे, बबन सक्रू व अन्य ३५० जणांना ताब्यात घेतले. यावेळी आचरा ठाण्यात जमा झालेल्या ग्रामस्थांनी तहसीलदार जोपर्यंत येणार नाहीत, तोपर्यंत आपण मागे न हटण्याची भूमिका घेतली. मालवणच्या तहसीलदार वनिता पाटील यांनी आचरा ग्रामस्थांची भेट घेत देवस्थान जमिनीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल विभागास पाठवला असून, येत्या दोन दिवसांत महसूल राज्यमंत्री यांच्याशी चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती देत ग्रामस्थांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. तहसीलदारांच्या आश्वासनाने ग्रामस्थांनी आंदोलन तात्पुरते स्थगित करत न्याय न मिळाल्यास २५ फेब्रुवारीला मालवण तहसील कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा मालवण तहसीलदारांना दिला. शासनदरबारी न्याय मिळत नसल्याने आचरा ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी दहा वाजता रास्ता रोको करण्यास सुरुवात केली. या रास्ता रोकोमध्ये सरपंच मंगेश टेमकर, जगदीश पांगे, अनिल करंजे, बबन सक्रू, जुबेर काझी, जेरोन फर्नांडिस, शेखर मोरवेकर, राजू नार्वेकर, अरविंद घाडी, रेश्मा कांबळी, श्रद्धा सक्रू व अन्य ४०० ते ५०० ग्रामस्थ सहभागी झाले. ग्रामस्थांनी एक कॉर्नर सभा घेत आचरा तिठ्यावर आंदोलनाला सुरुवात केली. यावेळी मोठ्या संख्येने पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. रास्ता रोको करण्यास सुरुवात करताच पोलीस निरीक्षक शिंदे यांनी आंदोलन बेकायदेशीर असल्याचे सांगत रास्ता रोको करणाऱ्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात करत सर्वांची रवानगी आचरा पोलीस ठाण्यामध्ये केली. तहसीलदार येईपर्यंत पोलीस ठाण्यात ठिय्या दरम्यान, आंदोलन स्थगित करण्याची विनंती करण्यासाठी मालवणचे नायब तहसीलदार सुहास खडपकर हे दाखल झाले होते. त्यांच्यावर ग्रामस्थांनी प्रश्नांचा भडिमार केला. जोपर्यंत मालवणच्या तहसीलदार हजर होत नाहीत, तोपर्यंत येथून हलणार नाही, अशी भूमिका घेत ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला. चिरे, वाळू व्यावसायिकांवर कारवाई करण्यास तहसीलदारांना वेळ असतो. मग ग्रामस्थांच्या व्यथा जाणून घेण्यास मालवणच्या तहसीलदारांना वेळ नाही काय? असा सवाल करत पोलीस ठाण्यातून न हलण्याचा निर्णय घेतला. माजी सरपंच राजन गावकर अनुपस्थित देवस्थान जमीनप्रश्नी लढ्यात नेहमीच पुढे असणारे माजी सरपंच राजन गावकर व चंदन पांगे यांची अनुपस्थिती यावेळी चर्चेचा विषय ठरली होती. दीड तासाने मालवणच्या तहसीलदारांचे आगमन दरम्यान, आचरा ग्रामस्थांच्या आक्रमक पवित्र्याने तब्बल दीड तासाने मालवणच्या तहसीलदार वनिता पाटील दाखल झाल्या. यावेळी मालवणच्या तहसीलदार यांनी हा प्रश्न आपल्या अखत्यारीत सुटणारा नसून शासनस्तरावर सुटणार असल्याचे सांगत देवस्थान जमिनीचा अहवाल हा जिल्हाधिकाऱ्यांकडून महसूल विभागास पाठविलेला आहे. येत्या दोन दिवसांत प्रधान सचिव व उपसचिव यांच्याशी चर्चा करून महसूल राज्यमंत्री योग्य निर्णय करणार असल्याची माहिती ग्रामस्थांना दिली.
देवस्थान जमीनप्रश्नी आचरेकरांचा रास्ता रोको
By admin | Published: January 05, 2016 12:29 AM