कणकवली : घरफोडी प्रकरणाचा तपास करताना पोलिसांकडून करण्यात येणारी दडपशाही तातडीने थांबविण्यात यावी. पोलीस तपासाच्या अयोग्य प्रक्रियेमुळे व्यावसायिकांचे मानसिक व आर्थिक खच्चीकरण होत असून ते तत्काळ थांबविण्यात यावे. अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा कणकवलीतील व्यापाऱ्यांनी हॉटेल साई पॅलेस येथे शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिला.यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्यवाह महेश नार्वेकर, तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष विशाल कामत, सचिव बाबू वळंजू, बंडु खोत, सुवर्णकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीपाद तोडणकर, गुरू मठकर, दैवज्ञ हितवर्धक समाज कणकवलीचे सल्लागार डॉ. विनय शिरोडकर, दादा बेलवलकर, सुवर्णकार धनंजय कसवणकर यांच्या पत्नी शिवानी कसवणकर, माजी आमदार राजन तेली यांच्यासह अन्य सुवर्णकार व व्यापारी उपस्थित होते. व्यापाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, मोर्चा काढून उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिले आहे. तसेच त्यांच्याकडे न्यायाची मागणी केली आहे. मात्र, पोलिसांकडून दडपशाही थांबवून न्याय मिळाला नाही तर सुवर्णकारांच्यावतीने जिल्हाभरात तीव्र आंदोलन करण्यात येईल. व्यापाऱ्यांचा त्याला पाठिंबा असेल. सुवर्णकार हे व्यापार करताना अनेकवेळा सोने खरेदी करीत असतात. सोने चोरीप्रकरणी पोलीस जेव्हा सुवर्णकाराकडे चौकशीसाठी येतात, तेव्हा सुवर्णकारास चोराचा साथीदार म्हणून वागणूक दिली जाते. हे अयोग्य आहे. पोलीस तपासात सुवर्णकाराची साक्षीदार म्हणून चौकशी करून जबानी नोंदवून घेण्यात यावी. सुवर्णकारी हा प्रतिष्ठीत व्यवसाय असून पोलिसांनी सुवर्णकारांना चांगली वागणूक द्यावी. जप्त केलेल्या ऐवजाची रितसर सहीशिक्क्याने पंचासमक्ष पोचपावती पोलिसांनी सुवर्णकाराला द्यावी. विनाकारण सुवर्णकाराची बदनामी, मानहानी व व्यावसायिक नुकसान होणार नाही याबाबत पोलिसांनी काळजी घ्यावी, अशी मागणी दैवज्ञ हितवर्धक समाज कणकवलीच्यावतीने निवेदनाद्वारे पोलिसांकडे करण्यात आली आहे. (वार्ताहर)काळजी घ्याविनाकारण सुवर्णकाराची बदनामी, मानहानी व व्यावसायिक नुकसान होणार नाही याबाबत पोलिसांनी काळजी घ्यावी, अशी मागणी दैवज्ञ हितवर्धक समाजाच्यावतीने पोलिसांकडे करण्यात आली आहे.
दडपशाही थांबवा; अन्यथा आंदोलन
By admin | Published: April 03, 2015 9:50 PM