तळवडे : तळवडेत अवैध दारू विक्रीचे प्रमाण मोठे आहे. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असून, त्यामुळे तरुण पिढी गैरमार्गांकडे वळू लागली आहे. जर गोव्यातून येणारी दारू बंद केली तर तळवडेत दारू विक्री होण्याचा प्रश्नच येणार नाही. म्हणूनच गोव्यातून येणारी अवैध दारू रोखा, या मागणीसाठी तळवडेतील ग्रामस्थांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यासमोर उपोषण केले.तळवडेतील अवैध दारू विक्री रोखण्याचे आश्वासन पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांनी दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. दरम्यान, आठ दिवसांत परिस्थितीत बदल न झाल्यास आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.तळवडेत अवैध दारू धंद्याच्या विरोधात सावंतवाडी येथील पोलीस उपविभागीय कार्यालयासमोर तळवडे येथील सामाजिक कार्यकर्ते बाळा जाधव यांच्यासह तळवडे सरपंच संदीप आंगचेकर, उत्तम परब, माजी सरपंच विजय रेडकर, निरवडे सरपंच प्रमोद गावडे, भारतीय जनता पार्टी तळवडे विभागीय अध्यक्ष बाळू साळगावकर, राजू मसुरकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र्र म्हापसेकर, अनिल वायंगणकर, नाना गावडे, श्यामसुंदर परब, सुभाष दळवी आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी उपोषणकर्ते बाळा जाधव यांनी तळवडे गावात होणाऱ्या दारू विक्रीमुळे तरुण पिढीचे मोठे नुकसान झाले आहे. पोलिसांकडे अनेकवेळा तक्रारी केल्या, पण ते कोणताही निर्णय घेत नाहीत. त्यामुळे आमच्यावर उपोषणाची वेळ आली आहे, असे स्पष्ट केले.यावेळी पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांनी तळवडे ग्रामस्थांना बोलावून घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी धनावडे यांनी तळवडे येथे दारू विक्री केली जाते त्यामध्ये कोणाकोणाचा सहभाग आहे याविषयी आम्ही माहिती गोळा केली आहे. यापुढे यातील कोणीही दारू विक्री करताना आढळून आल्यास पोलीस कडक कारवाई करतील, असे सांगितले.यावेळी तळवडे ग्रामस्थांनी तळवडेमध्ये कशाप्रकारे दारू विक्री केली जाते याची माहिती पोलिसांना दिली. यात प्रथम गोव्यातून येणारा अवैध दारुचा पुरवठाच बंद करा. मग अवैध दारू विक्रीचे प्रमाणही घटेल, असे सांगितले. तसेच आज अनेक शाळा बंद पडत आहेत. कारण युवक दारुच्या आहारी गेला आहे, याकडेही ग्रामस्थांनी पोलिसांचे लक्ष वेधले.यावेळी ग्रामस्थांनी आठ दिवसांची मुदत देऊन संबंधितांवर कडक कारवाई करून त्यांना रोखा, अशी मागणी केली. त्यानंतर पोलीस निरीक्षक धनावडे यांनी दारू विक्री करीत असलेल्या लोकांची नावे वाचून दाखविली.यापुढे तळवडे गावात दारू विक्री झाली तर त्याला सर्वस्वी पोलीस पाटील जबाबदार असणार असून, त्यांनी दारुची विक्री होत असल्याबाबत आम्हांला माहिती द्यावी, अशी सूचना केली. त्यानंतरही दारू विक्री सुरूच राहिली तर पोलीस पाटील यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव तयार करून पाठविला जाईल, असे सांगितले.त्यानंतर ग्रामस्थांनी पोलिसांना काही दिवसांची मुदत देऊन उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. प्रभारी नगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर यांनी उपोषणकर्त्यांना सरबत दिले आणि नंतर उपोषण मागे घेण्यात आले.
गोव्यातून होणारा मद्य पुरवठा रोखा, तळवडे ग्रामस्थांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 11:26 AM
तळवडेत अवैध दारू विक्रीचे प्रमाण मोठे आहे. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असून, त्यामुळे तरुण पिढी गैरमार्गांकडे वळू लागली आहे. जर गोव्यातून येणारी दारू बंद केली तर तळवडेत दारू विक्री होण्याचा प्रश्नच येणार नाही. म्हणूनच गोव्यातून येणारी अवैध दारू रोखा, या मागणीसाठी तळवडेतील ग्रामस्थांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यासमोर उपोषण केले.
ठळक मुद्देगोव्यातून होणारा मद्य पुरवठा रोखा, तळवडे ग्रामस्थांचे उपोषणअवैध दारू विक्री रोखण्याचे पोेलीस निरीक्षकांचे आश्वासन