कणकवली : मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणामुळे कणकवलीवासीयांना होणाऱ्या यातनांबाबत वारंवार बैठका, आंदोलने, निवेदने देऊन लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, गेंड्याची कातडी पांघरलेल्या प्रशासनाने याकडे केलेल्या दुर्लक्षामुळेच जनतेच्या भावनांचा उद्रेक झाला.
आमदार नीतेश राणे यांच्यासह कार्यकर्त्यांनी जनतेच्या भावनांना वाट मोकळी करून दिली. मात्र सत्तेचा वापर करीत प्रशासनामार्फत आंदोलकांबाबत सूडबुद्धीचे राजकारण करण्याचा प्रयत्न सुरू असून तो त्वरित थांबवावा, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी केली.तसेच ११ जुलै रोजी होणाºया जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत महामार्गाच्या दर्जाबाबत व लोकांना होत असलेल्या त्रासाबाबत चर्चा करण्यात येणार असून शासनाला त्याबाबत ठोस निर्णय घेण्यास भाग पाडणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. येथील स्वाभिमानच्या कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी स्वाभिमान पक्ष तालुकाध्यक्ष सुरेश सावंत उपस्थित होते.यावेळी सावंत म्हणाले, महामार्ग चौपदरीकरण काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याबाबत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या माध्यमातून आंदोलने करण्यात आली. वारंवार विधानसभेतही प्रश्न उपस्थित करीत प्रशासनाला निवेदने देण्यात आली. बैठका लावण्यात आल्या. सर्वच पक्षांनी महामार्गाचे काम योग्यप्रकारे होत नसल्याचे मान्य केले. मात्र, प्रशासनाने जनतेच्या भावनांकडे दुर्लक्ष केले. म्हणूनच अधिकाऱ्यांवर चिखलफेक करण्याचा प्रकार घडला. हा जनतेच्या भावनांचा उद्रेक होता.जनतेच्या जीविताशी खेळणाऱ्या महामार्ग प्राधिकरण व ठेकेदाराविरोधात कलम १०७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची आवश्यकता आहे. मात्र, प्रशासन याबाबीकडे दुर्लक्ष करीत आहे. महामार्गावर आंदोलनाचा प्रकार घडल्यावर आमदार राणे यांच्यासह १९ आंदोलकांवर दोन तासांत कारवाई करण्यात आली. मात्र महामार्गाच्या दुरवस्थेला कारणीभूत असलेल्या महामार्ग प्राधिकरणचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर कारवाईबाबत ७ दिवसांनंतर निर्णय घेण्यात येईल असे पोलीस प्रशासनामार्फत सांगण्यात आले.
हा दुजाभाव का? जनतेला अडचणीत टाकणाऱ्या या महामार्ग प्राधिकरणाविरोधी कारवाई करण्यात प्रशासन चालढकल करण्याचा प्रयत्न करीत आहे. महामार्गाच्या कामाची दर्जा तपासणी होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने आगामी काळात आम्ही पाठपुरावा करणार असून महामार्गाचे काम निकृष्टरित्या करणाऱ्यांना निश्चितच जाब विचारला जाईल.सकारात्मक काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना नेहमीच पाठिंबा देण्याचे काम आमचे नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे व आम्ही लोकप्रतिनिधींनी केले आहे. त्यामुळे प्रथम ही बाब विनाकारण टीका करणाऱ्यांनी लक्षात घ्यावी. प्रकाश शेडेकर यांनी काहीही काम न करता फक्त वाटाण्याच्या अक्षता लावण्याचे काम केले आहे. शेडेकर यांच्या कार्यपद्धतीमुळे त्यांना या प्रकाराला सामोरे जावे लागले.आजपर्यंत अनेक राजकीय आंदोलने झाली. यावेळी आंदोलकांना पोलीस कोठडीत एकत्र ठेवले जात होते. मात्र, यावेळी आंदोलकांना वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस कोठडीत ठेवत सत्ताधाºयांनी प्रशासनाचा वापर करीत सूडबुद्धीचे राजकारण केले आहे.धावण्याची स्पर्धा तूर्तास स्थगितमहामार्ग चौपदरीकरणामुळे कणकवलीत निर्माण झालेले चिखलाचे आणि खड्ड्यांचे साम्राज्य दाखविण्याच्या हेतूने महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्यावतीने अनोख्या धावण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धा होऊ नये म्हणून तालुकाध्यक्ष सुरेश सावंत यांना पोलीस प्रशासनाने नोटीस बजावली आहे. लोकशाही मार्गाने आम्ही हे आंदोलन करणार होतो. मात्र, सत्तेचा दुरुपयोग करून सत्ताधारी प्रशासनाला वापर करीत असून आम्ही आयोजित केलेली स्पर्धा दडपण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र चिखल न उडवता धावण्याची ही स्पर्धा आम्ही पुढील कालावधीत निश्चितपणे घेऊ, असे सावंत यांनी सांगितले.
त्यांना नुकसान भरपाई कोण देणार?कणकवलीत महामार्ग चौपदरीकरणाच्या कामामुळे पावसाने जवळपास ८३ लाखांच्या मालमत्तेची नुकसानी झाली आहे. पालकमंत्र्यांनी या नुकसानीबाबतची भूमिका जाहीर करावी.