सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद कार्यालयामध्ये आज तुफान राडा झाला. येथे ठाकरे गटाचे शिवसैनिक आणि एका ठेकेदाराच्या बॉडीगार्ड्समध्ये वादावादी होऊन त्याचे पर्यावसान धक्काबुक्कीमध्ये झाले. यावेळी टेंडर भरण्यासाठी आलेल्या एका ठेकेदाराने सोबत आणलेल्या बॉडीगार्ड्सनां शिवसैनिकांनी बेदम चोप दिला. दरम्यान, एका बांधकामाच्या ठेक्याचं टेंडर मॅनेज करण्यासाठी या ठेकेदाराने सोबत बॉडीगार्ड आणल्याचा आरोप होत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्ह्या परिषद कार्यालयामधील बांधकाम विभागात एका कामाचे टेंडर भरण्यासाठी सावंतवाडी येथील एक ठेकेदार आला होता.दरम्यान, या ठेकेदाराने सोबत आणलेले बॉडीगार्ड्स बांधकाम विभागाच्या कार्यालयाच्या दरवाजावर उभे राहून येणारे नागरिक आणि ठेकेदारांना अडवून त्यांच्याकडील कागदपत्रांची तपासणी करत होते. तसेच त्यांच्याकडून येणाऱ्या जाणाऱ्यांना दमदाटीही केली जात होती. ही बाब शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि पदाधिकाऱ्यांना समजल्यावर त्यांनी जिल्हा परिषद कार्यालयात धाव घेतली.
ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागाच्या कार्यालयात धडक देत सदर सुरक्षा रक्षकांकडे सुरू असलेल्या प्रकाराबाबत विचारणा केली. यावेळी ठाकरे गटाचे नेते, पदाधिकारी आणि सदर सुरक्षा रक्षकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. तसेच प्रकरण हातघाईपर्यंत आले. अखेरीस ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत या सुरक्षा रक्षकांना जिल्हा परिषदेच्या बांदकाम विभागाच्या कार्यालयातून हुसकावून लावले.
दरम्यान, या प्रकारामुळे जिल्हा परिषदेच्या कार्यालयात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी आता शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे.