बांदा : बांदा परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या अवकाळी पावसाने काल, गुरुवारी सायंकाळी तडाखा दिला. विलवडे, बांदा शहरासह ग्रामीण भागात ठिकठिकाणी रस्त्यावर, वीज वाहिन्यांवर झाडे उन्मळून पडल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. काल गुरुवारी सायंकाळी विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने वादळी वार्यासह शहर व परिसराला झोडपून काढले. बहुतांश ठिकाणी वीज कोसळल्याने वीज उपकरणे निकामी झालीत. वादळी पावसाचा सर्वाधिक फटका बांदा शहराला बसला. ज्ञानेश्वर सावंत यांच्या घरावर वडाचे भलेमोठे झाड पडल्याने सावंत यांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने सावंत हे कुटुंबियांसह घराच्या बाहेर असल्याने बचावलेत. घराच्या अंगणात असलेली दुचाकी व अॅम्ब्युलन्सचे नुकसान झाले. बांदा सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते यांच्या मदतीने ग्रामस्थांनी कोणत्याही शासकीय यंत्रणेची वाट न पाहता धीर देत मदत केली. महाकाय वडाचे झाड कटरच्या साहित्याने बाजूला केला. शहरातील विराज देसाई (गवळीटेम्ब) यांच्या घराचे पत्रे उडून गेले, शंकर आगलावे यांच्या घराच्या छपराचे, उर्मीला उरुमकर यांच्या घरावर काजूचे झाड कोसळून नुकसान झाले. संजय धुरी व फय्याज खतीब यांच्या घरावर वीज कोसळून वायरिंग जळाल्याने नुकसान झाले. विलवडे, नेतर्डे, शेर्ले, डेगवे, वाफोली येथे देखील अनेक घरांचे वादळी पावसाने नुकसान झाले. बांदा शहर व पारिसरात २५ हून अधिक वीज खांब कोसळले. यामुळे शहर व ग्रामीण भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. गुरुवारी सायंकाळी सहाय्यक अभियंता एस. आर. कोहळे यांनी वीजपुरवठा सुरळीत केला. ग्रामिण भागात काही ठिकणी वीजपुरवठा सुरु करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू असल्याचे सांगितले.
Sindhudurg: बांदा परिसरात वादळी पावसाचा तडाखा, शासकीय यंत्रणेची वाट न पाहता स्थानिक ग्रामस्थांचे मदत कार्य
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: May 24, 2024 12:36 PM