सिंधुदुर्ग : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यात कोविडच्या नियमांची कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. जिल्ह्यात दिवसभरात 381 व्यक्तींवर मास्क वापरत नसल्यामुळे दंडात्मक कारवाई करण्यात आली.यामध्ये महसूल विभागाने काल एका दिवसात 26 व्यक्तींवर कारवाई करत एकूण 5 हजार 200 रुपयांचा दंड वसूल केला आहे तर पोलिसांनी 181 व्यक्तींवर कारवाई करत एकूण 36 हजार 200 रुपयांचा दंड वसूल केला आहे. नगर पालिका क्षेत्रामध्ये 154 व्यक्ती या विनामास्क आढळून आल्याअसून त्यांच्याकडून एकूण 30 हजार 800 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तर जिल्ह्याच्या ग्रामिण भागामध्ये 20 व्यक्तींवर मास्क वापरत नसल्याप्रकरणी कारवाई करून त्यांच्याकडून 4 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. काल दिवसभरात वसूल करण्यात आलेल्या एकूण दंडाची रक्कम ही 76 हजार 200 रुपये इतकी आहे.त्याशिवाय जिल्ह्यातील महसूल, पोलीस आणि नगर पालिका प्रशासनाकडून एकूण 96 ठिकाणांची तपासणी करण्यात आली असून त्यामध्ये 2 ठिकाणी कोविडच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी कोविडच्या नियमांचे पालन करावे, तसेच मास्क, हॅन्डसॅनिटायझर आणि सुरक्षित अंतराचे पालन करावे असे आवाहन नागरिकांना जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.कणकवली तालुक्यात कंटेन्मेंट झोनकणकवली तालुक्यातील 2 ठिकाणी कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आला आहे. सदर कंटेन्मेंट झोन पुढील प्रमाणे आहेत. मौजे कणकवली शहर येथील तेलीआळी येथील घर क्र. 2/248 व घर क्र. 2/177 व परिसर येथे दिनांक 8 मार्च 2021 रोजी रात्री 12 वाजे पर्यंत कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आला आहे.सदर कंटेन्मेंट झोनमध्ये जाहीर करण्यात आलेल्या दिनांकापर्यंत सर्व अस्थपना, दुकाने, वस्तुविक्री बंद राहणार आहे. तसेच नागरिकांच्या येण्या-जाण्यास व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. सदर आदेश अत्यावश्यक सेवा जसे सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकीय उपचार व्यवस्था इ. वितरीत करणारे, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या वाहनांना लागू असणार नाहीत.
या आदेशाचा भंग केल्यास संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 व 58, तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 71,139 आणि भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल असे आदेश कणकवलीच्या प्रांताधिकारी यांनी दिले आहेत.