कणकवली : नांदगाव परिसरातील गावांमधून जाणाऱ्या शिवगंगा नदी (पियाळी नदी)च्या पाण्यात वाळू वॉशिंग प्लांटमधील पाणी सोडल्याने ते गढूळ झाले आहे. मात्र, त्याला जबाबदार असलेले वाळू वॉशिंग प्लांटधारक आपली चूक कबूल करीत नाहीत.
त्यामुळे या सर्व वॉशिंग प्लांटची पाहणी आपण स्वतः करणार असून त्यांनी कोणत्या परवानग्या घेतल्या आहेत याची प्रत्यक्ष तपासणीही करण्यात येईल. तसेच त्यात दोषी आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा तहसीलदार आर. जे. पवार यांनी दिला आहे.नांदगाव परिसरातील सरपंचांनी नदीच्या गढूळ पाण्याच्या मुद्यावरून तसेच इतर समस्यांबाबत कणकवली तहसील कार्यालयासमोर १० फेब्रुवारी रोजी उपोषण केले होते. त्यावेळी संबंधित प्लांटधारक व सरपंचांची एकत्रित बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्याचे आश्वासन तहसीलदार आर. जे. पवार यांनी दिले होते. त्यानुसार कणकवली तहसील कार्यालयात बैठक झाली.यावेळी निवासी नायब तहसीलदार सुजाता पाटील, महसूल नायब तहसीलदार आर. व्ही. राठोड, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, आरोग्य विभागाचे प्रशांत बुचडे आदी अधिकारी उपस्थित होते. यावेळी वाघेरी सरपंच संतोष राणे यांनी प्रशासनाकडून नोटिसा निघतात; मात्र, प्रत्यक्षात कारवाई होत नाही. अशी खंत व्यक्त केली.यावेळी नांदगाव सरपंच आफ्रोजा नावलेकर, असलदे सरपंच पंढरी वायंगणकर, उपसरपंच संतोष परब, कोळोशी सरपंच रितिका सावंत, हडपीड सरपंच दाजी राणे,नीरज मोरये, अशोक बोभाटे, सुशील इंदप, उत्तम सावंत, भाई मोरजकर तसेच वाळू व्यावसायिक नितीन खांदारे, विजय देसाई, सचिन नर, राजन देसाई, वैभव गोवेकर आदी उपस्थित होते.पाण्याचे सर्व नमुने पिण्यायोग्यनांदगाव, असलदे आदी गावांतील पाण्याचे नमुने एकत्र करून ते पडताळणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. ते पाणी दूषित नसून पिण्यास योग्य असल्याचा अहवाल आला असल्याची माहिती आरोग्य विभागाचे प्रशांत बुचडे यांनी दिली. तर सरपंचांनी पाण्यातील केमिकल्सची तपासणी करा अशी मागणी यावेळी केली.