सावंतवाडी : शासनाने दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदीची घोषणा केल्यानंतर त्याचा मोठा परिणाम सावंतवाडीत दिसून आला. सायंकाळी पोलीस स्वत: फिरून दुकाने बंद करण्यापासून तलावाकाठी बसणाऱ्यांवर बंदी घालत आहेत. त्यामुळे सर्वत्र शुकशुकाट दिसत आहे. तसेच मंगळवारचा आठवडा बाजारही बंद केल्याने अनेक व्यापारी बाजार न थाटताच निघून गेले. मात्र, मंगळवार असल्याने बाजारपेठेत मात्र तुरळक गर्दी दिसत होती.कोरोनाची दुसरी लाट येऊ घातल्याने शासनाने राज्यात सर्वत्र दिवसा जमावबंदी, तर रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. याची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने शासनाची नियमावली आणि त्यात आपले मुद्दे घालून मागील लॉकडाऊनवेळी केलेली अंमलबजावणी यांची री ओढण्यास सुरुवात केली असून, त्याचा परिणाम सोमवारी सायंकाळपासून सर्वत्र दिसून आला आहे.
रात्री आठनंतर सर्व दुकाने बंद करा, असा आदेश असल्याने पोलिसांनी स्वत: फिरून शहरातील दुकाने बंद केली. काहीजण दुकाने बंद करण्यास विलंब करीत होते. त्यांना पाच हजार दंड ठोठावला जाईल, असा इशारा दिला असल्याने दुकाने बंद करण्यात आली. दुसरीकडे, मोती तलावाकाठी अनेकजण फिरण्यासाठी किंवा बसण्यासाठी येत असतात. त्यांनाही पोलिसांनी बसण्यास मज्जाव केला.कडक पोलीस बंदोबस्तसावंतवाडीचा आठवडा बाजारही रद्द करण्यात आला आहे. सोमवारी रात्री उशिरा जिल्हाधिकारी यांनी स्वत: परिपत्रक काढून जिल्ह्यातील सर्व आठवडा बाजार रद्द करीत असल्याचे जाहीर केले; त्यामुळे आठवडा बाजारासाठी आलेल्या काही व्यापाऱ्यांना आल्यापावली निघून जावे लागल्याचे दिसून येत होते. मंगळवार असल्याने तुरळक गर्दी मात्र बाजारात दिसत होती; पण पोलिसांनीही बंदोबस्त कडक ठेवल्याचे दिसून येत होते.