सिंधुदुर्गनगरी : सर्वोच्च न्यायालयाच्या निदेर्शानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सध्या वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. सरद कारवाई अधिक कडक व प्रभावीपणे करण्याच्या सूचना आज येथे निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये रस्ते सुरक्षा समितीची बैठक झाली त्यावेळी या सूचना देण्यात आल्या.सर्वोच्च न्यायालयाने वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे सांगून निवासी उपजिल्हाधिकारी जोशी पुढे म्हणाले की, विना हेल्मेट वाहन चालवणे, वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणे, सीट बेल्टचा वापर न करणे, मद्य प्राशन करुन वाहन चालवणे या सारख्या जीविताशी संबंधीत गुन्ह्यांवर कारवाई करण्यात येत आहे. याची आमंलबजावणी प्रभावीपणे करावी तसेच कारवाई आणखी कडक करावी.
या कारवाईअंतर्गत शासकीय वाहनांवरही कारवाई करण्यात आली आहे. तसेच पोलिस विभागाच्या वाहनांवरही कारवाई केली आहे. या कारवाई विषयी नागरिकांमध्ये जागृती होण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी कारवाई व दंडाच्या रकमेविषयी माहिती देणारे बॅनर्स लावण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.या कारवाई अंतर्गत आतापर्यंत साडे तीन हजार पेक्षा जास्त वाहनांवर कारवाई करण्यात आली असून दंडापोटी पंचवीस लाखांपेक्षा जास्त रक्कम वसूल करण्यात आल्याची माहिती बैठकीमध्ये देण्यात आली. तसेच बसस्थानक, बाजरपेठांसह नगरपालीका क्षेत्रांमध्ये बॅनर्स लावण्यात आल्याची माहितीही देण्यात आली.
याशिवाय या कारवाई दरम्यान काही नागरिक दबाव आणत असल्याचा मुद्दा ही उपस्थित करण्यात आला. यावर सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश व नागरिकांच्या जीविताचा विचार करता कोणत्याही प्रकारच्या दबावास बळी न पडण्याच्या सूचना संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना करण्यात आल्या.
नागरिकांना वाहतूक नियमांचे योग्य रित्या पालन करावे व कोणत्याही प्रकारच्या कारवाईवेळी दबावतंत्राचा वापर करु नये असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले. सदर कारवाई ही नागरिकांच्या सुरक्षेसाठी आहे. कोणत्याही प्रकारचा दंड वसुल करणे किंवा महसूल वाढवणे यासाठीची ही कारवाई नसून जीविताच्या सुरक्षेशी संबंधीत कारवाई आहे.
रस्ते सुरक्षा हा जिवन मरणाचा प्रश्न असून रस्ते वाहतुकीच्या नियमांचे सर्वांनी योग्य पालन करणे महत्वाचे आहे. अशा कारवाईवेळी दबाव आणून कारवाई टाळणे तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे हे सर्वस्वी नागरिकांच्या सुरक्षेसाठी धोकादायक आहे. त्यामुळे कारवाईमध्ये कोणताही अडथळा आणू नये असे आवाहन यावेळी करण्यात आले.