मालवण : देवली सडा येथे वाळू तस्करांविरोधात महसूल व पोलिस पथकाने मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास धडक कारवाई केली. यावेळी २८ डंपर व डंप केलेला वाळू साठा ताब्यात घेण्यात आला. कारवाई दरम्यान डंपर चालकांनी पळ काढला. घटनेचा पंचनामे सुरू असल्याची माहिती तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिली. मध्यरात्री सुरू झालेली कारवाई सकाळ पर्यत सुरू होती.ज्या डंपरमध्ये वाळूसाठा भरून होता ते डंपर मालवण तहसील कार्यालयात नेण्यात आले. तर उर्वरित डंपर व डंप केलेला वाळूसाठा यांचा पंचनामा सुरू होता. डंपरमध्ये वाळू भरण्यासाठी असलेला एक जेसीबी पळून गेला. त्याचीही माहिती घेण्याचे काम सुरू होते. या कारवाईत महसूलचे अधिकारी, पोलिस कर्मचारी सहभागी होते.
तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पोलिस निरीक्षक एस. ए. भोसले (ओरोस), मालवण पोलिस निरीक्षक विजय यादव, उपनिरीक्षक झांजुरणे यासह पथकाने ही कारवाई केली.