मालवण : मालवण तालुक्यातील बहुचर्चित वायंगणी-तोंडवळी येथे प्रस्तावित ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला व ओशियानिक वर्ल्ड (सी-वर्ल्ड) प्रकल्प व्हावा, असा सर्व पक्षीय सूर असताना अद्यापही वायंगणी-तोंडवळीवासीय प्रकल्पाला ‘सावध’ विरोध दर्शवित आहेत. काहीजण प्रकल्प होण्यासाठी आग्रही आहेत, तर बरेच ग्रामस्थ विरोध करीत आहेत. मात्र, सी-वर्ल्डसारखा जागतिक पर्यटन प्रकल्प सिंधुदुर्गात झाल्यास पर्यटन व अर्थव्यवस्थेत जिल्ह्याचा कायापालट होऊ शकतो. हेही तितकेच खरे असल्याचे बोलले जात आहे. ‘सी वर्ल्ड’ येणाऱ्या काळात सिंधुदुर्गच्या पर्यटनाचे केंद्रबिंदू असतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंधु महोत्सवात जाहीर करताना ओशियानिक वर्ल्ड प्रकल्प १३९० एकर जागेत न करता ४० टक्के म्हणजेच २०० ते ४०० एकर जागेतच हा प्रकल्प साकारला जाईल, अशी घोषणाही केली होती. यावेळी तोंडवळी व वायंगणी ग्रामस्थांनी वायंगणी येथील श्री देव गांगेश्वर मंदिरात घेतलेल्या बैठकीत सरकार बदलले, तरी आमची प्रकल्प विरोधी भूमिका बदलणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यांची ही भूमिका कायम आहे. ग्रामस्थांचा सी-वर्ल्ड प्रकल्पाला विरोध कशासाठी? याची माहिती न घेताच मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पाच्या घोषणा केली. प्रकल्प होईल, पण भविष्यात आमच्या डोळ्यांदेखत आमची लूट होणार असल्याची ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सी वर्ल्डविषयी माहिती घेण्यासाठी आलो असता तेथील ग्रामस्थ कमालीचे सावध दिसले. प्रकल्पाबाबत तुमचे मत काय, असे विचारताच ठोस प्रतिक्रिया आलीच नाही. दरम्यान, सी वर्ल्ड व्हावा यासाठी सरकार आग्रही आहे. पालकमंत्री दीपक केसरकर यांचेही समर्थन दिसते. मात्र, आमदार वैभव नाईक यांनी सी वर्ल्डप्रश्नी भूमिका स्पष्ट केलेली नाही. मालवण पंचायत समितीच्या आमसभेच्या निमित्ताने काँग्रेस, मनसेने सी वर्ल्ड वरून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, आमदार त्यांच्यापेक्षाही वरचढ बनले. त्यांनी भूमिका स्पष्ट करण्यासाठी आमसभा नसल्याचे ठणकावून सांगितले, तर मनसेच्या पदाधिकाऱ्यांना तुमची भूमिका काय, असा प्रतिसवाल करीत राजकीय चालीने गप्प करीत शेवटी सी वर्ल्डला बगल दिलीच. त्यामुळे गेली चार-पाच वर्षे सी वर्ल्ड या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा ‘नारळ’ केव्हा फुटणार याचीही उत्सुकता प्रकल्पग्रस्त ग्रामस्थ व राजकीय नेत्यांना आहे. प्रकल्प साकारतोय कुठे ?प्रकल्पाबाबत वायंगणी गावात भेट दिली असता, सुरुवातीला ग्रामस्थांची सावध भूमिका पाहायला मिळाली. काही ग्रामस्थांशी भेटलो असता काहींनी प्रकल्पावर बोलणे टाळले, तर काहींनी प्रकल्पच नको, अशी भूमिका घेतली. वायंगणी-तोंडवळी गावात प्रकल्प साकारतोय खरा, पण प्रकल्प नेमका कोणत्या जागी उभारणार याची पुसटशी कल्पना ना ग्रामस्थांना ना महसूलला. केवळ वृत्तपत्रातून येणाऱ्या बातम्या वाचून सी वर्ल्ड विषयी आम्हाला कळते. मात्र, ३५० एकर म्हणजे नेमकी कुठची जागा आहे याची कल्पना कोणालाच नाही. शासन व प्रशासन आपल्याच स्तरावर चर्चा करून निर्णय घेत आहेत. येथील ग्रामस्थांना विश्वासात घेतले नसल्याने कदाचित विरोधाची री अद्यापही कायम आहे. दरम्यान, या सगळ्यात काही प्रकल्पाचे स्वागत करणारेही ग्रामस्थ मिळाले. मात्र, काहींनी आपली वृत्तपत्रात नावे जाहीर करू नका, असेही सांगितले. शासन आणि प्रकल्पवासीय ग्रामस्थांत समन्वय नाही. केवळ मीडियाच्या माध्यमातून सी वर्ल्डविषयी ऐकतोय. सी वर्ल्ड हा आम्ही लादून घेणार नाही. सी वर्ल्ड विषयीची भूमिका आजही ग्रामस्थांची कायमच आहे. शासनाने ३५० एकर क्षेत्रातील अधिकृत आराखडा प्रसिद्ध करावा. तसेच ३५० मध्ये कोणकोणते सर्व्हे नंबर येणार आहेत हे स्पष्ट केल्यावर ग्रामस्थ भूमिका स्पष्ट करतील. तसेच जरी हा प्रकल्प ३५० एकरमध्ये होत असला तरी धनदांडग्यांनी येथील जमीन खरेदी केल्या आहेत. त्यामुळे येथील जनतेला भविष्यात रोजगार मिळणे कठीणच आहे. जी कंपनी प्रकल्प साकारत आहे तिचे नाव काय आहे? भविष्यात ३५० एकरमध्ये प्रकल्प झाला नाही तर जागा वाढली तर याला जबाबदार शासन राहील काय? येथील जनतेवर अन्याय होणारा प्रकल्प नको. त्यामुळे यापुढेही ग्रामस्थांचा सी वर्ल्डला ठाम विरोध राहील. - विरोधक ग्रामस्थ, वायंगणी, (विरोधक प्रतिक्रिया देण्यास तयार नाहीत)‘वेट अँड वॉच’ची भूमिकासी वर्ल्ड जिल्ह्याचा रूप बदलणारा प्रकल्प आहे. मात्र, प्रकल्पाबाबत आधी जाहीर झालेल्या १३९० एकर असो वा आता फडणवीस सरकारने कमी जागेत ३५० एकर जागेची माहिती आजतागायत वायंगणी ग्रामपंचायतीस दिली नाही. वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रातून प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांपासून आम्हाला माहिती मिळत आहे. जिल्ह्याच्या विकासाचा विचार करता सी वर्ल्ड होणे गरजेचे असल्याचे आम्ही व्यक्त केले होते. मात्र, ग्रामस्थांनी ठाम विरोध दर्शविला. भाजपने कमी जागेत प्रकल्प साकारण्याच्या भूमिकेबाबत भूमिका स्पष्ट करणे आवश्यक आहे. विकासाच्या दृष्टीने प्रकल्पला समर्थनच आहे. परंतु, सद्य:स्थितीत ‘वेट अॅण्ड वॉच’ भूमिका पसंत केली आहे. - हनुमंत प्रभू, उपसरपंच, वायंगणीपारदर्शी कारभार करणे आवश्यकसी वर्ल्ड प्रकल्प हा पर्यटनाचा मानबिंदू ठरणारा प्रकल्प आहे. असे असले तरी स्थानिक ग्रामस्थ व भूमिपुत्रांचा सी वर्ल्डला कमालीचा विरोध आहे. यासाठी शासनाने सी वर्ल्ड साकारताना पारदर्शकता आणून स्थानिकांना विश्वासात घ्यावे. येथील ग्रामस्थांना या प्रकल्पाचे भविष्यात काय फायदे आहेत? हे शासनाने स्पष्ट करणे अपेक्षित आहे. सी वर्ल्डच्या प्रस्तावित जागेत पाटील कुटुंबीयांची चार ते पाच एकर जागा आहे. प्रकल्पाला विरोध नाही. शासनाने पारदर्शी कारभार करून प्रकल्प राबविल्यास प्रकल्प यशस्वी होऊ शकतो.- आशिष पाटील, तोंडवळीविश्वासात घेऊन प्रकल्प राबवासी वर्ल्ड प्रकल्पाला आमचा विरोध नाही. स्थानिकांना विश्वासात घेऊन शासनाने प्रकल्प राबवावा. प्रस्तावित सी वर्ल्डच्या क्षेत्रात मुंज कुटुंबीयांची सुमारे १२ एकर जागा आहे. भविष्यात जिल्ह्यात पर्यटन वाढल्याने अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. म्हणूनच प्रकल्प व्हावा, असे आमची इच्छा आहे.- बबन मुंज, तोंडवळी ग्रामस्थसंधी गमावल्यास मोठी हानीविकासाच्या कामाला विरोध करणे हे गैर आहे. जागतिक दर्जाचा प्रकल्प आपल्या गावात साकारतोय हे अभिमानास्पद आहे. आपल्या जिल्ह्याला आलेली ही विकासाची मोठी संधी आहे. ही संधी गमावल्यास मोठी हानी होऊ शकते. ग्रामस्थांचा विरोध आहे, असेही म्हणता येणार नाही. ३५० एकर क्षेत्रात होणारा प्रकल्प हा येथील स्थानिकांच्या फायद्याचाच आहे. विरोधाला विरोध म्हणून सारा गाव एक झाला आहे. लोकांनी प्रकल्पाविषयी असणारी भीती दूर करून सकारात्मक विचार करायला हवा. - एक समर्थक ग्रामस्थ, वायंगणी
प्रस्तावित ‘सी-वर्ल्ड’ला सावध विरोध
By admin | Published: August 26, 2015 11:30 PM