सिंधुदुर्गनगरी : गेले पंधरा दिवस दडी मारलेल्या मान्सूनने सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज, गुरूवारी सकाळपासून पुन्हा दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. ऐन शेतीच्या हंगामात पाऊस गायब झाल्याने शेतकरी चिंतातूर होता. भातरोपांच्या लावणीसाठी पाणीच नसल्याने शेतकरी हतबल झाला होता. आज सकाळपासून पावसाने हजेरी लावल्याने आता शेतीच्या कामांना वेग येणार आहे.सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे जोरदार पाऊस हे समीकरण आहे. मात्र, यावर्षी तब्बल महिनाभर पावसाने दडी मारल्याने जिल्ह्याचे आजवरचे समीकरणच बिघडून गेले होते. जूनच्या सुरूवातीला पावसाने हजेरी लावली. त्याबरोबर वादळी वाऱ्याचेही आगमन झाल्याने जिल्ह्यातील जनतेचे मोठ्या प्रमाणात खाजगी व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसानही केले. मात्र, त्यानंतर पावसाने जून अखेरपर्यंत दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनले होते. शेतीची कामे खोळंबली होती. काही ठिकाणी पाणीटंचाईचे संकटही कायम होते. गुरूवारी सकाळपासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू झाल्याने जिल्हावासीयांची सकाळ आनंददायी ठरली आहे. तर शेतकरी सुखावले आहेत. भातशेतीची रखडलेली कामे जलद गतीने पूर्ण करण्यासाठी कामाला जोर आला आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज सकाळी ८ वाजेपर्यंत संपलेल्या चोवीस तासात सरासरी ४.८५ मि.मी. एवढा पाऊस झाला तर आतापर्यंत एकूण सरासरी ४४१.५८ मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. गतवर्षी ३ जुलैपर्यंत एकूण सरासरी पाऊस १३०७ मि.मी. एवढा झाला होता. गतवर्षीच्या मानाने आतापर्यंत सुमारे ३० टक्के एवढाच पाऊस पडला आहे. मात्र, गुरूवारी पहाटेपासून जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. (प्रतिनिधी)
जिल्ह्यात पावसाची दमदार सुरूवात
By admin | Published: July 03, 2014 11:52 PM