वैभववाडी : राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियानांतर्गत प्रशिक्षणावर अवाजवी झालेला खर्च संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्यातच या अवास्तव खर्चाला विरोधी आणि सत्ताधारी सदस्यांनी आक्षेप घेत प्रशिक्षण खर्चाच्या चौकशीची एकमुखी मागणी केली आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी अटळ असल्याची खात्री होताच प्रशिक्षण खर्चाच्या रकमेवर डल्ला मारणाऱ्या अधिकाऱ्यांनी चौकशीच्या फेऱ्यातून सुटण्यासाठी आटापिटा सुरू केला आहे.
पंचायत समिती पदाधिकाऱ्यांनी चौकशीवेळी गप्प रहावे; यासाठी त्या अधिकाऱ्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा सुरू केली आहे. त्यामुळे या प्रशिक्षणाची चौकशी कधी आणि कशी होतेय याकडे लक्ष लागले आहे. प्रभागस्तरीय प्रशिक्षणाचे निव्वळ सोपस्कार उकरल्यानंतर पंचायत समिती स्तरावर सरपंच, ग्रामसेवक आणि पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांसाठी १५ व १६ नोव्हेंबरला प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला होता.त्यावर १ लाख ३१ हजार रुपये खर्च दाखविण्यात आला. परंतु, १ लाख ३१ हजार रुपयांपैकी ९० हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेचा गैरव्यवहार झाल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे. त्यामुळे या प्रकारावरून पंचायत समितीच्या सभेत सर्व सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत कामकाज रोखून धरले होते. त्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा चौकशी अधिकारी दीपाली पाटील यांनी आठ दिवसांत चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे या अवाजवी खर्चाची चौकशी होणार हे आता निश्चित आहे.
चौकशीसाठी अधिकारी येण्यापूर्वी या खर्चात डल्ला मारणाऱ्या अधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी सुरू करून हे प्रकरण मिटविण्यासाठी पाय धरायला सुरुवात केली आहे. त्यामुळे चौकशी कधी आणि कशी होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.चौकशीवेळी पदाधिकाऱ्यांना दूर ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांचे शर्थीचे प्रयत्नप्रशिक्षण खर्चाच्या गैरव्यवहाराची चौकशी होईल त्यावेळी पदाधिकाऱ्यांना कल्पना द्या, अशी सूचना पदाधिकाऱ्यांनी सभेत केली आहे. त्यामुळे चौकशी अधिकाऱ्यांसमोर पदाधिकारी आले तर प्रशिक्षणात साऊंड सिस्टीम कोणाची होती? प्रोजेक्टर आणि व्हीडोओ कॅमेरा कोणाचा वापरला? पेन किती रुपयाचे होते. याची अधिकाऱ्यांसमोर पोलखोल केली जाणार हे निश्चित आहे. त्यामुळे हे पदाधिकारी चौकशीवेळी उपस्थितच राहू नयेत यासाठी ह्यत्याह्ण अधिकाऱ्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.बिले देणाऱ्यांनाच प्रशिक्षण?चौकशीत पदाधिकाऱ्यांकडून फारसे सहकार्य मिळणार नसल्याचे लक्षात येताच त्या अधिकाऱ्यांनी खर्चाची बिले देणाऱ्यांकडे मोर्चा वळवला आहे. ज्या ज्या लोकांच्या नावे रक्कम खर्च घातली आहे त्यांना बोलावून वेगवेगळ्या प्रकाराची आमिषे दाखवित आहेत. चौकशी अधिकाऱ्यांसमोर कसे बोलावे, काय उत्तर द्यावे याचे प्रशिक्षणच त्यांना दिले जात असल्याची कुजबूज अंतर्गत गोटातून कानावर येत आहे. त्यावरून प्रशिक्षण खर्चाच्या गैरव्यवहारात अडकलेले ते अधिकारी चौकशीतून सहीसलामत सुटण्यासाठी खटाटोप करीत आहेत.