सावंतवाडी : सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या घरावर काँग्रेसने काढलेला मोर्चा पोलिसांनी येथील श्रीराम वाचन मंदिरकडेच अडवला. यावेळी पोलीस आणि आंदोलनकर्त्यांत चांगलीच झटापट झाली. मात्र, पोलिसांनी आमदार नीतेश राणे, माजी खासदार नीलेश राणे, सतीश सावंत, संजू परब यांच्यासह ४५ जणांना ताब्यात घेतले. यावेळी काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, पोलिसांनी समन्वयाची भूमिका घेतल्याने आंदोलन शांततेत पार पडले.काँग्रेसने पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या घरावर मंगळवारी आंदोलन छेडण्याचा इशारा दिल्यानंतर सावंतवाडीतील पालकमंत्री केसरकर यांच्या घराच्या परिसरात १४४ कलम लावण्यात आले होते. त्यामुळे आंदोलनकर्त्यांना श्रीराम वाचन मंदिराजवळ अडविण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला होता. आंदोलनापूर्वी प्रभारी पोलीस अधीक्षक तुषार पाटील व आमदार नीतेश राणे, माजी खासदार नीलेश राणे यांच्यात चर्चा झाली होती.सकाळी साडेअकराच्या सुमारास काँग्रेसचा पालकमंत्र्यांच्या घरावर मोर्चा निघाला. मात्र, काही वेळातच पोलिसांनी तो अडवला. तेथेच आंदोलनकर्त्यांनी सभा घेतली. सभेनंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, आमदार नीतेश राणे यांच्यासह जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी त्याला विरोध करीत जोपर्यंत प्रांताधिकारी येथे येणार नाहीत, तोपर्यंत येथून हलणार नाही, असे म्हणत तेथेच ठिय्या आंदोलन केले. यावेळी काही काळ तणाव निर्माण झाला होता.आंदोलनात सहभागी असलेल्या ४५ काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आणखी २५० जणांना घेणार असून, याला आणखी दोन ते तीन दिवस जातील, असे पोलीस निरीक्षक रणजित देसाई यांनी यावेळी सांगितले. आंदोलनाच्या बंदोबस्तासाठी प्रभारी पोलीस अधीक्षक तुषार पाटील, पोलीस उपअधीक्षक उत्तम चौरे, स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलीस निरीक्षक विश्वजीत कार्इंगडे, सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक रणजित देसाई, रतनसिंग राजपूत, सुरेश पवार, सुनील मोरे, हेमंतकुमार शहा, संजय साबळे आदींसह दोनशे ते अडीचशे पोलीस सावंतवाडीत तळ ठोकून होते. (प्रतिनिधी)पोलिसांत समन्वयाचा अभावप्रशासनाने पूर्णत: आंदोलन दडपण्याचा निर्णय घेतला होता, पण आंदोलन कसे दडपायचे, याची पोलिसांकडे व्यूहरचना नव्हती. त्यामुळे पोलीस आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यासाठी चाचपडताना दिसत होते. काहीवेळा तर अधिकारी कर्मचाऱ्यांवर राग काढत होते. त्यामुळेच पोलिसांमध्ये समन्वयाचा अभाव दिसून येत होता.शिवसेना कार्यकर्तेही पालकमंत्र्यांच्या घरासमोर काँग्रेस पालकमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करणार असल्याने त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेनेचे शंभर ते दीडशे कार्यकर्ते आमदार वैभव नाईक, संजय पडते यांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्र्यांच्या निवासस्थानी जमा झाले होते. यावेळी पोलिसांनीही खबरदारीचा उपाय म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
पोलीस-आंदोलकांत झटापट
By admin | Published: January 19, 2016 10:33 PM