तळवडे : आज शालेय विद्यार्थ्यांनी शिक्षणापुरते मर्यादित न राहता शालेय स्तरावर होणाऱ्या विविध स्पर्धांसह विविध क्रीडा महोत्सवामध्ये सहभागी होऊन बालपणातच करिअरची दिशा बनवावी, असे मत सावंतवाडी पोलीस उपअधीक्षक उत्तम चौरे यांनी व्यक्त केले. दर्शन विद्या एज्युकेशन सोसायटी व साई होली फेथ स्कूल निरवडे, यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी जिमखाना मैदानावर आयोजित सावंतवाडी तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या बक्षीस वितरणप्रसंगी ते बोलत होते.या स्पर्धेत १४ वर्षाखालील गटाचे विजेतेपदाचा बहुमान आरपीडी हायस्कूल, सावंतवाडीने तर माजगाव येथील भाईसाहेब सावंत विद्यालयाने उपविजेतेपद मिळविले. १७ वर्षाखालील गटात आरपीडी हायस्कूलने विजेतेपद तर भाईसाहेब सावंत विद्यालयाने उपविजेतेपद मिळविले. बक्षीस वितरण उपअधीक्षक चौरे यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर साई होली फेथ स्कूल, निरवडेचे अध्यक्ष चंद्रशेखर जैन, शिक्षक-पालक संघाचे अध्यक्ष श्रीधर मराठे, प्रदीप दळवी, शैलेश नाईक, वैभवी तानावडे, कल्पेश राऊळ, नितीन परब, शिक्षक, कर्मचारी व इतर मान्यवर उपस्थित होते. निरवडे येथील अतिग्रामीण भागात साई होली फेथ स्कूल ही संस्था कार्य करीत असलेल्या शैक्षणिक कार्याबाबत उपस्थितांनी गौरवोद्गार काढले. संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांना पालक व ग्रामस्थांचेही चांगले सहकार्य मिळत आहे. (प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांनी स्पर्धांमधील सहभागाने करिअर बनवावे
By admin | Published: December 25, 2015 9:59 PM