दोडामार्ग : गोव्यातील तरूणांकडून दोडामार्ग बाजारपेठेतील स्थानिकांना झालेल्या मारहाणीचे तीव्र पडसाद शहरात उमटल्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी उपविभागीय पोलीस अधिकारी पी. सी. चिंचाळकर यांनी दोडामार्गला भेट देत घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर पोलीस ठाण्यात ग्रामस्थांशी त्यांनी यासंदर्भात चर्चा केली. यावेळी उपस्थित नागरिकांनी पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण होऊन देखील मारहाण करणाऱ्या गोव्यातील गुंडांवर गुन्हा दाखल का केला नाही? असा सवाल उपस्थित करीत दोषींवर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी लावून धरली. रात्री उशिरापर्यंत ही चर्चा सुरू होती.बुधवारी सायंकाळी कलंगुट गोवा येथील चौघा तरूणांकडून दोडामार्ग पंचायत समितीचे उपसभापती आनंद रेडकर व त्यांचे भाऊ नाना रेडकर यांना मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीत दोघेही रेडकर बंधू गंभीर जखमी झाले होते. ज्यावेळी मारहाणीची घटना घडली, तेव्हा त्यांना सोडवायला गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना सुध्दा मारहाण झाली होती. स्थानिक ग्रामस्थांनी मारहाण करणाऱ्या तिघांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले होते. तर चौथा तरूण पळाला होता. पोलिसांनी या तिघांना अटक केल्यानंतर त्यांची दुसऱ्या दिवशी जामिनावर मुक्तता झाली. त्या तिघाही तरूणांना जामीन मिळायला पोलिसांनी मदत केली. त्यांच्या कमकुवत कारवाईमुळेच न्यायालयाने जामीन मंजूर केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता. तसेच पोलीस प्रशासनाच्या निषेधार्थ दोडामार्ग बाजारपेठ पूर्णत: बंद ठेवून कडकडीत बंद पाळत सर्वपक्षीय बैठकीत पोलीस निरीक्षक जे. बी. सूर्यवंशी व सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार यांच्या बदलीची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षकांना याबाबत निवेदन देण्यात आले होते. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी सायंकाळी उशिरा उपविभागीय पोलीस अधिकारी पी. सी. चिंंचाळकर यांनी दोडामार्गला भेट दिली. पोलीस निरीक्षक जे. बी. सूर्यवंशी यांच्यासोबत त्यांनी बाजारपेठेतील घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर पोलीस ठाण्यात नागरिकांशी यासंदर्भात चर्चा केली. यावेळी सेनेचे तालुकाप्रमुख बाबुराव धुरी, भाजपचे तालुकाप्रमुख संदीप नाईक, संदेश बोर्डेकर, चेतन चव्हाण, संदेश नाईक, संदीप रेडकर, आनंद रेडकर, संदीप गवस, आनंद तांबुळकर, लवू मिरकर, गोविंद शिरोडकर, यशवंत आठलेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)ग्रामस्थांशी चर्चा : अधिकाऱ्यांना धरले धारेवर४या बैठकीत नागरिकांनी पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण होऊनसुध्दा मारहाण करणाऱ्या गोव्यातील तरूणांवर गुन्हा दाखला का केला नाही, असा प्रश्न उपस्थित करीत त्यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. रात्री उशिरापर्यंत याच गोष्टीवर चर्चा सुरू होती. जामीन नामंजूर करून आरोपींना पोलीस कोठडी मिळावी, यासाठी जिल्हा सत्र न्यायालयात रिव्हिजन अर्ज दाखल केला असल्याचे चिंचाळकर म्हणाले. रात्री उशिरापर्यंत चिंचाळकर आणि ग्रामस्थ यांच्यात चर्चा सुरू होती.
उपविभागीय अधिकाऱ्यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2016 1:00 AM