काँग्रेस तालुकाध्यक्षांची तक्रार भोवली; कणकवली पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक शरद देठेंची तडकाफडकी बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2022 12:06 PM2022-01-11T12:06:24+5:302022-01-11T12:07:08+5:30
पोलीस उपनिरीक्षक शरद देठे व अन्य पोलिस अधिकारी या सोशल क्लबच्या एका कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांचे सोशल मीडियावर फोटो देखील व्हायरल झाले होते.
कणकवली : कणकवली तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांनी कणकवली पोलिस ठाण्याचे दोन अधिकारी वागदे येथील एका सोशल क्लबच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल सातत्याने आंदोलन केले. याआंदोलनाची दखल घेत अखेर कणकवली पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शरद देठे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.
पोलीस उपनिरीक्षक शरद देठे व अन्य पोलिस अधिकारी या सोशल क्लबच्या एका कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांचे सोशल मीडियावर फोटो देखील व्हायरल झाले होते. त्यांच्यावर कारवाईची मागणी प्रदीप मांजरेकर यांनी केली होती. याबाबत मांजरेकर यांनी कणकवली पोलीस ठाण्यासमोर आंदोलनही छेडले होते.
तसेच त्यापूर्वी पालकमंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई, सतेज पाटील यांना देखील मांजरेकर यांनी निवेदन देत कारवाईची मागणी केली होती. दरम्यान, त्यानंतरही कारवाई होत नसल्याने मांजरेकर यांनी ओरोस येथे जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले होते.
मात्र, मांजरेकर यांच्या सातत्यपूर्ण आंदोलनामुळे अखेर त्यांच्या मागणीची दखल घेत कणकवली पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शरद देठे यांची काही दिवसांपूर्वीच सावंतवाडी तालुक्यातील आंबोली दूरक्षेत्राच्या प्रभारी अधिकारी पदावर तात्पुरत्या स्वरूपात बदली करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा देठे यांची दहशतवाद विरोधी कक्षात पुढील आदेश होईपर्यंत बदली करण्यात आली आहे. त्यामुळे सोशल क्लब च्या कार्यक्रमाला उपस्थित राहणे पोलीस उपनिरीक्षक देठे यांना भोवल्याची चर्चा आहे.