कणकवली,5 : कणकवली नगरपंचायतीमधील सत्ताधारी अकार्यक्षम असून शहराचा विकास करण्यास असमर्थ ठरले आहेत . त्यामुळे त्यांच्या सोबत सत्तेत सहभागी न होण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. शुक्रवारी होणाऱ्या नगरपंचायतीच्या विषय समिती सभापती पदाच्या निवड प्रक्रियेत नारायण राणे समर्थक आठ नगरसेवक तसेच एक स्वीकृत नगरसेवक सहभागी होणार नसल्याची माहिती माजी उपनगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह अन्य नगरसेवकांनी येथे दिली.
येथील नारायण राणे संपर्क कार्यालयात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नगरसेवक किशोर राणे, बांधकाम सभापती अभिजीत मुसळे, माया सांब्रेकर, सुविधा साटम,अण्णा कोदे आदी उपस्थित होते.
समीर नलावडे म्हणाले, कणकवली नगरपंचायतीच्या विषय समिती सभापती निवडिसाठी उपस्थित रहाण्याचे पत्र आम्हा नगरसेवकाना प्रशासनाकडून आले आहे. या निवडीच्यावेळी आम्ही हजर राहिलो तर आमच्या गटाचा सभापती होऊ शकतो. मात्र, सत्ताधाऱ्यानी शहराला विकासापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न गेली दोन वर्षे केला आहे. राज्यात तसेच केंद्रात भाजप - शिवसेनेची सत्ता असतानाही कणकवली शहर विकासासाठी सत्ताधाऱ्याना निधी आणता आलेला नाही. त्यामुळे अशा बिनकामाच्या सत्तेत आम्ही सहभागी न होण्याचा निर्णय आमदार नीतेश राणे यांच्या आदेशामुळे घेतला आहे.
आमच्या गटाचे आठ नगरसेवक तसेच स्वीकृत एक नगरसेवक विषय समिती सभापती निवडीच्या वेळी अनुपस्थित रहाणार आहोत. त्याबाबतचे रितसर पत्र आमचे गटनेते नगरसेवक किशोर राणे मुख्याधिकारी तसेच पीठासीन अधिकाऱ्यांना देणार आहेत.
नगरपंचायतीच्या माध्यमातून गेली दोन वर्षे कोणतेही विधायक काम शहरात करण्यात आलेले नाही. सत्ता आहे पण निधी नाही अशी सत्ताधाऱ्यांची स्थिति झाली आहे. आमचे नेते नारायण राणे सत्तेत असताना कोट्यावधीच्या निधी त्यांनी आणला होता. मात्र,सध्याच्या सत्ताधाऱ्यानी नगरपंचायतीसाठी नियमित येणाऱ्या निधी व्यतिरिक्त कोणताही वेगळा निधी आणलेला नाही. त्यामुळे विकास कामे रखडली आहेत.
2 लाख रूपये अंदाजित खर्चाचे काम ओढून ताणून 5 लाखा पर्यन्त नेण्याचे काम सत्ताधारी करीत आहेत. त्यांनी शहरात कोणते विधायक काम गेल्या दोन वर्षात केले ते दाखवावे. शहरातील अनेक ठिकाणी स्ट्रीट लाईट बंद आहेत, गटारे तुंबली आहेत त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील अनधिकृत बांधकामा विरोधात आम्ही आवाज उठविला. मात्र,संबधितावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी त्यांना अभय देत आहेत.
नगराध्यक्षा व उपनगराध्यक्ष यांच्या भांडणातच दोन वर्षे निघुन गेली आहेत. नगरपंचायतीत नगराध्यक्ष कधीतरी येतात. तर उपनगराध्यक्षांची ही तशीच स्थिति आहे. त्यामुळे नागरिकांच्या समस्या तशाच शिल्लक रहात आहेत. जिल्ह्यातील इतर नगरपालिकांच्या कामाच्या तुलनेत कणकवली नगरपंचायतीचे काहीच काम दिसत नाही. वॉटर कंझ्युमर्स मीटर घोटाळ्याविषयी आवाज उठवूनही त्याबाबत अजूनही कारवाई झालेली नाही. नगरपंचायतीत भ्रष्ट कारभार चालला आहे. त्याला आमचा कायमच विरोध राहील. तसेच जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही नेहमीच कटिबध्द राहु असेही समीर नलावडे यांनी यावेळी सांगितले.
नगरपंचायतीत सत्ताधाऱ्यांची मनमानी !नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा दोन महिन्यानी घेणे अपेक्षित असताना तिन महिन्यानी घेतली जाते. जनतेच्या प्रश्नांबाबत आस्था नसल्याने अशी मनमानी सत्ताधाऱ्यांची चालली आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या सोबत सत्तेत सहभागी होणार नाही. असेही समीर नलावडे यानी यावेळी सांगितले.