कणकवली : खारेपाटण येथील शेतकऱ्यास ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी माजी आमदार प्रमोद जठार यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी. अन्यथा कणकवली पोलीस स्थानकासमोर उपोषण आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुरेश सावंत यांनी दिला आहे.खारेपाटण उपसरपंच श्रीकृष्ण भालेकर यांना बॅँक आॅफ इंडियाच्या शाखा व्यवस्थापकांनी म्हैस खरेदीची उर्वरित २५ टक्के रक्कम शासनाची सबसिडी मिळत नसल्याने भरण्यास सांगितले. ती रक्कम न भरल्यास जप्तीची कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. त्याचवेळी खारेपाटण येथे आलेले माजी आमदार जठार समक्ष आल्याने भालेकर त्यांना भेटले. तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही म्हैशी घेतल्या. बॅँकेकडून २५ टक्के रक्कम भरण्यास सांगितली जात आहे. तुम्ही बँक मॅनेजरशी बोला, असे सांगितले. जठार हे शाखा व्यवस्थापकांशी बोलल्यानंतर भालेकर यांना ‘मी तुझ्या बापाचा नोकर आहे का? तू मला का विचारलेस?’ असे म्हणून भालेकर यांच्या कॉलरला धरून अंगरक्षकाच्या ताब्यात देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर याला कासार्डे येथे घेऊन चला. त्याला ठार मारूया, असे बोलले, असे निवेदनात म्हटले आहे. या प्रकरणाची योग्य ती चौकशी होऊन माजी आमदार जठार यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा.अन्यथा कॉँग्रेस पक्षातर्फे उपोषण करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे पोलीस निरीक्षकांना देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
प्रमोद जठारांवर गुन्हा दाखल करा
By admin | Published: December 07, 2015 11:23 PM