सिंधुदुर्ग : तौक्ते वादळामुळे झालेल्या फळबागा, झाडे, महावितरण, घरे अशा नुकसानग्रस्तांचे पंचनामे करुन तात्काळ अहवाल सादर करावा अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. वादळात झालेल्या नुकसानाबरोबरच भूमिगत विद्युत वाहिनी, धूप प्रतिबंधक बंधारे, चिपी विमानतळ याबाबतही आढावा घेतला.चिपी विमानतळ येथे झालेल्या आढावा बैठकीस पालकमंत्री उदय सामंत, परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, मुख्य सचिव सीताराम कुंटे उपस्थित होते.मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, वादळाची पूर्वसूचना मिळल्याबरोबर यंत्रणा कार्यान्वीत झाली होती. यावेळेला जास्त प्रमाणात नुकसान झाले आहे. अशाही परिस्थितीत कोविड रुग्णांचा ऑक्सिजन पुरवठा खंडित होऊ दिला नाही. त्याबद्दल धन्यवाद देतो. पंचनामे लवकर संपवून तात्काळ अहवाल पाठवावा, जेणेकरून कुणीही वंचित राहणार नाही, नुकसानग्रस्तांना मदत देण्याबाबत निर्णय घेतला जाईल. भूमिगत विद्युत वाहिनी, धूप प्रतिबंधक बंधारे याबाबतही आढावा घेऊन मुख्यमंत्री म्हणाले, जे प्रस्ताव केंद्राकडे आहेत त्याबाबत निश्चित पाठपुरावा केला जाईल. राज्यस्तरावरील प्रस्तावांना मार्गी लावण्यात येईल.चिपी विमानतळाबाबतही आढावा घेऊन लवकर सुरू करण्याबाबत त्यांनी सूचना केली.संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी तयारी हवी, मिशन ऑक्सिजन अंतर्गत जिल्ह्याला स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टीने ऑक्सिजन जनरेशन प्रकल्प उभे करण्याबाबत प्रयत्न करावेत. आरोग्य यंत्रणेला आवश्यक सर्व गोष्टी पुरवल्या जातील असेही ते म्हणाले.पालकमंत्री सामंत म्हणाले, जिल्ह्यात मोठी बंदरे आहेत. अशा ठिकाणी आपत्कालीन कक्ष सुरू केल्यास यंत्रणा सज्ज राहील. सीआरझेड बाबत लवकर बैठक व्हावी असेही ते म्हणाले.खासदार राऊत म्हणाले, भूमिगत विद्युत वाहिनी आणि संरक्षण करणारे 21 बंधारे या योजना महत्वाच्या आहेत. 21 बंधारे मंजूर आहेत. हे दोन्ही विषय मार्गी लावावेत.
आमदार केसरकर म्हणाले, काळ्या दगडाचे बंधारे घालणे, अंडग्राऊंड केबलचे काम पूर्ण करावे, मच्छीमारांच्या जाळ्या वाहून जातात त्याबाबत नोंदी व्हाव्यात. वाहून गेलेल्या मस्त्यबीजाची नुकसान भरपाई मिळावी.आमदार नाईक यांनीही मंजूर बंधाऱ्यांचे कामकाज पूर्ण होण्याबाबत सूचना मांडली.जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी संगणकीय सादरीकरण करून नुकसानीचा सविस्तर आढावा दिला. यामध्ये पूर्वतयारी, पूर्वसूचना, चक्रीवादळापूर्वीची यंत्रणेची सज्जता, नागरिकांचे स्थलांतर, मच्छीमार नौकांची माहिती, 16 मे ते 19 मे दरम्यान झालेले पर्जन्यमान, घरांचे नुकसान, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, शेतीचे नुकसान, मच्छीमारांचे नुकसान, महावितरण नुकसान आदीचा समावेश होता.पोलीस उपमहानिरीक्षक संजय मोहिते, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, अपर जिल्हाधिकारी मंगेश जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा शल्य चिकिस्तक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे आदींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.