कुडाळ : माणगाव खोऱ्यातील मोरे येथील शासकीय वनक्षेत्रातील अवैध वृक्षतोड प्रकरणातील मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळण्यात वन विभागाला यश आले आहे.
वनकोठडीत असलेल्या सावंत पिता-पुत्रांच्या कबुली जबाबानुसार मुख्य आरोपी अनिल परब (रा. आंबेगाव-सुतारवाडी) व सावळाराम कृष्णा जाधव (आंबेगाव-चावडीवाडी) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची वनकोठडी सुनावली. दरम्यान, सावंत पितापुत्रांची न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली.मोरे येथील शासकीय वनक्षेत्रातील सुमारे २१ हजार ७० रुपये किमतीच्या आठ सागांच्या अवैध तोडप्रकरणी मंगळवारी वन विभागाने आंबेगाव येथील देविदास सावंत व अक्षय सावंत या पितापुत्रांना अटक केली होती.
न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची वन कोठडी सुनावली होती. अधिक चौकशीदरम्यान त्यांनी दिलेल्या कबुलीजबाबात या प्रकरणात अनिल परब व सावळाराम जाधव या दोघांचा हात असल्याचे समोर आले. त्यानुसार वन अधिकाऱ्यांनी अनिल परब याच्या आंबेगाव येथील घर व घराच्या परिसराची छाननी केली.
यावेळी झुडपात लपवून ठेवलेले सागाचे चौफळ नग १४ व घरातून चौकटीसाठी तयार केलेले सागाचे चौफळ नग ८ असा सुमारे ११ हजार ७६ रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. तर परब याचा सहकारी जाधव याला आंबेगाव-चावडीवाडी येथून ताब्यात घेतले.चारही आरोपींनी मोरे गावाच्या शासकीय वनांत वृक्षतोड केलेली बुडे प्रत्यक्ष दाखवून अवैध वृक्षतोड करून त्याची विक्री केल्याचा गुन्हा कबूल केला. परब व जाधव यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची वनकोठडी सुनावली. तर देविदास सावंत व अक्षय सावंत यांची जामिनावर मुक्तता केली.या गुन्ह्याचा अधिक तपास उपवनसंरक्षक समाधान चव्हाण व सहाय्यक वनसंरक्षक सुभाष पुराणिक यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ वनक्षेत्रपाल प्र. गो. कोकितकर करीत आहेत.
तपासकामात कडावल वनक्षेत्रपाल अमोल चिरमे, सावंतवाडी वनक्षेत्रपाल गजानन पानपठे, माणगाव वनपाल सु. प्र. सावंत, कालेली वनरक्षक सु. शि. भंडारे, वाडोस वनरक्षक पी. यू. पाटील, माणगाव वनरक्षक गु. मा. देवळी, तुळस वनरक्षक सा. स. कांबळे, मठ वनरक्षक वि. श. नरळे, नेरुर वनपाल वि. ना. मयेकर, नेरुर वनरक्षक सु. म. सावंत, कुडाळ-कडावल रेंज स्टाफ, कर्मचाऱ्याचे सहकार्य लाभले.वन्य तस्करांना ताब्यात घेणारदरम्यान, या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या अन्य तस्करांना ताब्यात घेऊन त्यांचा पर्दाफाश करण्यासाठी वनविभाग अहोरात्र सक्रिय असून त्यांचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांना ताब्यात घेणार असल्याची माहिती कुडाळ वनक्षेत्रपाल कोकितकर यांनी दिली.