सुधीर सावंत यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2019 11:26 AM2019-10-03T11:26:33+5:302019-10-03T11:28:14+5:30
माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी अखेर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, महासचिव के. वेणूगोपाल, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, कोकण प्रभारी बी. संदीप, राजू वाघमारे आदी उपस्थित होते.
सावंतवाडी : माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी अखेर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, महासचिव के. वेणूगोपाल, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, कोकण प्रभारी बी. संदीप, राजू वाघमारे आदी उपस्थित होते.
माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आल्यानंतर सुधीर सावंत आणि त्यांच्यात पक्षसंघटनेतून वाद झाले. यावेळी आपणास पक्षकार्यातून डावलण्यात येत असल्याचा आरोप करीत दहा वर्षांपूर्वी सावंत यांनी काँग्रेसपासून फारकत घेतली होती.
त्यानंतर सावंत यांनी बसपा तसेच शिवराज्यपक्ष व अलीकडच्या काही वर्षांत आम आदमी पक्षात प्रवेश केला होता. त्यांची महाराष्ट्राच्या समन्वयकपदी नेमणूक करण्यात आली होती.मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर देशातील काँग्रेसविरोधी वातावरण बघून सावंत यांनी पुन्हा स्वगृही परतण्याची इच्छा व्यक्त केली होती.
आता खरी काँग्रेसला आपली गरज असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यामुळेच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मध्यस्थी करीत सावंत यांना काँग्रेसमध्ये प्रवेश मिळावा, असा आग्रह पक्षश्रेष्ठींकडे धरला.
त्यानंतर सोमवारी रात्री उशिरा दिल्ली येथे काँग्रेस भवनाच्या बाहेर त्यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी खर्गे यांंनी सावंत यांचे पक्षात स्वागत केले. तसेच लवकरच त्यांच्यावर कोकणची महत्त्वाची जबाबदारी देण्याचे सूतोवाचही केले. प्रवेशाच्या कार्यक्रमाला दिल्लीसह राज्यातील नेत्यांनी उपस्थिती लावल्याने सावंत यांच्या प्रवेशाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
सुधीर सावंत लवकरच जिल्ह्यात
काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर माजी खासदार सुधीर सावंत हे लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार असून, त्यांचे ठिकठिकाणी स्वागत केले जाणार आहे. त्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे जिल्हा सरचिटणीस राजू मसुरकर यांनी सांगितले. सावंत येत्या दोन ते तीन दिवसांत सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार आहेत.