मालवण : मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी मालवण तालुक्यातील हडी गावचे सुपुत्र तथा मुंबई-माटुंगा येथील रुईया कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुहास पेडणेकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांच्या जन्मगावी एकच जल्लोष करण्यात आला. मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू पदावर निवड होणारे डॉ. पेडणेकर हे डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दुसरे सुपुत्र आहेत. पेडणेकर यांच्या निवडीमुळे जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण आहे.मालवण तालुक्यातील हडी जठारवाडी येथे पेडणेकर यांचे मूळ घर आहे. डॉ. पेडणेकर यांचे पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण हडी येथील जठारवाडीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं. २ मध्ये झाले. तर पाचवी ते सातवीपर्यंतचे शिक्षण जठारवाडी येथीलच शाळा नं. १ मध्ये झाले. त्यानंतर आठवीपासून दहावीपर्यंतचे त्यांचे माध्यमिक शिक्षण ओझर विद्यामंदिर कांदळगाव येथे झाले.
घरची गरीब परिस्थिती असूनही परिस्थितीशी झुंज देत त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. प्रसाद कांबळी (नाट्य परिषद अध्यक्ष) आणि आता डॉ. सुहास पेडणेकर (कुलगुरू) या मालवणच्या दोन सुपुत्रांनी आपल्या कर्तृत्वाने मालवण-सिंधुदुर्ग अर्थात कोकणच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला.
हडी गावात लहानपण गेलेल्या डॉ. सुहास पेडणेकर यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड झाल्याने गावासाठी ते भूषणावह आहे. त्यामुळे या गावच्या भूषणाचा नागरी सत्कार करून गावात जल्लोषी वातावरणात आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे. डॉ. पेडणेकर यांच्या निवडीमुळे राज्यात हडी गावाचे नाव झाले आहे. मुंबई विद्यापीठाच्या अनेक उपक्रमांना आता हडी गावात चालना मिळेल, असा विश्वास सरपंच महेश मांजरेकर यांनी व्यक्त केला.पेडणेकरांचा ग्रामस्थांकडून सन्मानमुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड झालेल्या डॉ. सुहास पेडणेकर यांच्या यशात महत्त्वपूर्ण वाटा असलेले त्यांचे मोठे बंधू रामदास पेडणेकर यांचा हडी आणि कांदळगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी सायंकाळी हृद्य सत्कार केला.
हडीत फटाक्यांची आतषबाजी करीत ग्रामस्थांनी पेडणेकर यांच्या निवडीबद्दल कुटुंबीयांचे अभिनंदन केले. यावेळी ओझर विद्यामंदिर स्कूल कमिटीचे अध्यक्ष किशोर नरे, उमेश कोदे, नारायण सुर्वे, नारायण हडकर, गणपत देऊलकर, सदानंद शेडगे, मनोहर आचरेकर, बबन अमरे, मनोहर आचरेकर, पप्या पेडणेकर आदी उपस्थित होते.