राजापूर : राजापूर शहरातील प्रसिद्ध संस्कृत पाठशालेत पौरोहित्याचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना बुधवारी घडली. यामध्ये मयत झालेल्या तरुणाचे नाव संदेश उल्हास फडके असून, मागील तीन वर्षे तो या पाठशालेत शिक्षण घेत होता. मात्र, त्याने ही आत्महत्या कौटुंबिक ताणतणावातून केली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे.रत्नागिरी तालुक्यातील कुर्धे या गावातील उल्हास फडके यांना दोन मुले असून त्यातील संदेश हा दुसरा मुलगा होता. यापूर्वी कौटुंबिक अडचणीतून उल्हास फडके यांनी मोठ्या मुलाची जबाबदारी त्याच्या मामाकडे तर संदेशची जबाबदारी त्यांचे चाफे गावातील जवळचे मित्र सूर्यकांत गणेश जोशी यांच्याकडे दिली होती. त्यानंतर संदेशचे पालनपोषण जोशी यांनीच केले. शिवाय प्राथमिक शिक्षणही दिले.कालांतराने त्यांनी संदेशला पौरोहित्य शिक्षण देण्याचा निर्णय घेतला. राजापुरातील प्रसिद्ध संस्कृत पाठशालेत दाखल केले. मागील तीन वर्षे तो येथे राहूून पौरोहित्याचे यशस्वी शिक्षणाचे पाठ घेत होता. यावर्षी संदेशचे शिक्षण पूर्ण होणार होते व त्यानंतर मिळालेले ज्ञान त्याला उदरनिर्वाहासाठी उपयोगी ठरणार होते. तत्पूर्वी त्याने आत्महत्या करुन आपला जीवनप्रवास संपवला. या घटनेने राजापुरात खळबळ उडाली.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी तो आपल्या सहकाऱ्यांसमवेत चांगल्या मुडमध्ये होता. या पाठशालेत एकूण १० विद्यार्थी असून त्यापैकी आठ विद्यार्थी तेथील वसतिगृहात राहतात. रात्री शेजारी असलेल्या एका कार्यक्रमात तबला वाजवण्यासाठी संदेश आपल्या मित्रांसमवेत गेला होता. त्यानंतर आपल्या खोलीवर परतल्यानंतर इतरत्र केलेल्या पौरोहित्याचे एकत्रित मिळालेल्या मानधनाचे वाटपदेखील संदेशने मित्रांना केले होते. रात्री प्रत्येकाला गुडनाईटचा संदेश देऊन सर्वजण झोपी गेले.या पाठशालेच्या कामकाजानुसार सर्व विद्यार्थी पहाटे ५ वाजता उठून प्रातर्विधी उरकून सहा वाजल्यापासून पाठाला सुरुवात होते. त्यासाठी वसतिगृहातील सर्व विद्यार्थी उठले आणि त्यांची आवराआवर सुरु असताना संदेश बाजूला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला आणि सर्वजण हादरुन गेले. असे काही विपरीत घडेल याची कुणालाच कल्पना नव्हती. घटनेची माहिती पाठशालेतील शिक्षकांना देण्यात आली. ही घटना ऐकून आजूबाजूची मंडळी घटनास्थळी धावली. दरम्यान त्याचवेळी राजापूर पोलीस स्थानकात माहिती देण्यात आली. पोलीसदेखील हजर झाले व तपासणी झाली.संदेशचे वडील उल्हास व त्याचा सांभाळ करणारे सूर्यकांत जोशी हे तातडीने राजापुरात दाखल झाले. नंतर विच्छेदन करुन त्याचा मृतदेह जोशी यांच्या ताब्यात देण्यात आला.या घटनेने राजापुरात खळबळ उडाली असून, राजापुरात नावलौकिक मिळवत मागील १२५ वर्षांहून अधिक काळ उज्ज्वल कामगिरी करणाऱ्या संस्कृत पाठशालेत प्रथमच अशी दुर्घटना घडली आहे. कौटुंबिक ताणतणावातून संदेशने ही आत्महत्या केली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे या घटनेने त्याच्या मित्रपरिवाराला मोठा धक्का बसला आहे. (प्रतिनिधी)संदेशने अचानक आत्महत्या का केली, त्याचा शोध पोलीस घेत असतानाच संदेशच्या एका वहीत त्याने आपण आत्महत्या करीत असल्याचा स्पष्ट उल्लेख केला आहे. आज दि. २५ मार्चला आपण काही कारणास्तव आत्महत्या करीत असून, त्यासाठी कुणालादेखील जबाबदार धरले जाऊ नये. आपल्याला सहकार्य करणारे जोशी कुटुंबीय, मित्रपरिवार या सर्वांना मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आपले अंत्यसंस्कार चाफे या गावी करावेत असे लिहिले आहे. पोलिसांनी ती वहीदेखील ताब्यात घेतली.
पौरोहित्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या
By admin | Published: March 25, 2015 10:23 PM