आंबोली : आंबोलीत सद्या उन्हाळी पर्यटन हंगामानिमित्त पर्यटकांची रेलचेल वाढली असून अधूनमधून पडणाऱ्या सरीमुळे हा हंगाम आणखीनच बहरला आहे. तर शहरावर ओढली जाणारी धुक्याची चादर पर्यटकांना आकर्षक करत आहे. शहरातील वाढत्या उखाड्यापासून आणि धकाधकीपासून आपली सुटका करून घेण्यासाठी मुंबई पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील पर्यटक आंबोलीत आपला मुक्काम वाढवत येथील थंड हवेच्या ठिकाणांना भेटी देताना दिसत आहेत. आंबोलीत साधारणत: एप्रिल महिन्यापासून पर्यटक येण्यास सुरूवात होते. परंतु गेल्या काही वर्षातील स्पर्धा परीक्षा, करिअरच्यादृष्टीने अती जागरूक झालेले पालक आपल्या पाल्यांना विविध खाजगी शिकविण्यामध्ये भरती करत असल्याने त्याचा परिणाम इथल्या पर्यटनावर दिसू लागला आहे. आता पर्यटक तब्बल २५ दिवस उशिराने म्हणजे १० मे च्या दरम्यान आंबोलीत येत असल्याचे दिसत आहे. शिवाय येथील पर्यटनस्थळांची संख्या मर्यादित असल्याने आंबोली अवघ्या एका दिवसात पाहून लोक निघत आहेत. आंबोलीत पंधरा ते सोळा निवासी व्यवस्था असलेले हॉटेल्स आणि पस्तीसच्या आसपास भोजनालये आहेत. सद्यस्थितीत या सर्वच्या सर्व हॉटेल्सची आरक्षणे पूर्ण होत आली असून हा पर्यटन हंगाम १० जूनपर्यंत चालणार आहे. पर्यटक मोठ्या संख्येने सद्या सुट्टीची मजा लुटताना आढळत आहेत. (वार्ताहर)
उन्हाळी पर्यटन हंगामाने आंबोली बहरली
By admin | Published: May 19, 2016 11:31 PM