सावंतवाडी : विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही म्हणत माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी भविष्यातील राजकारणाच्या संकेत दिले. निमित्त होते ते कवी केशवसुत यांच्या १५६ व्या जयंती निमित्ताने शहरातील सामाजिक बांधिलकी या सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या सुंदरवाडी कवी संमेलनाचे. या कवी संमेलनाचे उद्घाटन साळगावकर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे यांचा सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ साहित्यिक डॉ.जी. ए. बुवा, ज्येष्ठ नगरसेविका अनारोजीन लोबो, साहित्यिक प्रभाकर भागवत, सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते रवी जाधव, संजय पेडणेकर, शैलेश नाईक, सतीश बागवे, अशोक पेडणेकर उपस्थितीत होते.बबन साळगावकर यांनी कवी सुरेश भट यांच्या विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही, ही कविता सादर करून सुंदरवाडी कविसंमेलनाला वेगळीच रंगत आणली. मात्र आपण सादर केलेल्या कवितेचा वेगळा अर्थ जोडून कृपया कोणीही त्याचा राजकीय विपर्यास करू नये, असेही ते म्हणाले.गझलकार विश्वास यांची कोई दीवाना कहता है, कोई पागल समजता है, धरती की बेचैनी को बस, बादल समजता है. ही गझल सादर करून उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर संमेलनात उपस्थित असलेले बालकवी पासून नवोदित कवी, युवा कवी व ज्येष्ठ कवीपर्यंत उत्तरोत्तर काव्य मैफल रंगत गेली.यात ज्येष्ठ साहित्यिक डॉ.जी.ए.बुवा यांनी आता कविता करण्याचे दिवस आहेत काय. असे सांगत आपल्या कवितेतून कवींना अंतर्मुख केले. त्यानंतर ज उषा परब, मालवणी कवी दादा मडकईकर, रुपेश पाटील, कल्पना बांदेकर, स्नेहा कदम, विठ्ठल कदम, किशोर वालावलकर, मनोहर परब, सीताराम गावडे, भूषण आरोसकर, मंगल नाईक-जोशी, वाय.पी.नाईक, विनायक गांवस, ऋतुजा सावंत-भोसले, प्रकाश तेंडोलकर, मृण्मयी पोकळे, स्वप्ना गोवेकर, प्रा.ॲड.अरुण पणदुरकर, प्रज्ञा मातोंडकर, बी.जी.बोर्डे, सौम्या गोवेकर, एकनाथ कांबळे, अनिल कांबळे यांच्यासह अनेक कवींनी कविता सादर केल्या.यावेळी ज्येष्ठ नगरसेविका अनारोजीन लोबो, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा साक्षी वंजारी, डॉ. मधुकर घारपुरे, प्रा.केदार म्हसकर, प्रदीप ढोरे, सुधीर धुमे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष देवेंद्र टेंमकर आदी उपस्थित होते
विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही; साळगावकरांनी सादर केली कविता अन् म्हणाले..
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 4:54 PM