सावंतवाडी : काँग्रेस आयोजित सुंदरवाडी महोत्सवाला खरी भुरळ घातली ती रॉक स्टारनी. युवाई तर रॉक स्टारच्या गाण्यावर बेधुंद झाली होती. त्यामुळे ‘इतवार की शाम रॉक स्टार के नाम’ असेच म्हणावे लागेल. हजारो रसिकांच्या उपस्थितीत येथील जिमखाना मैदानावर हा म्युझिकल शो पार पडला. काँग्रेसच्यावतीने गेले तीन दिवस सुंदरवाडी महोत्सवाचे आयोजन केले होते. या महोत्सवाचा समारोप रविवारी पडला. यावेळी रॉक स्टार म्युझिकल डायरेक्टर सचिन गुप्ता म्युझिकल नाईटचे आयोजन केले होते. यामध्ये रितु रंजन मोहंती, दर्शन रावल, अक्सा सिंग आदींनी आपल्या सादरीकरणाने रसिकांची मने जिंकली. कार्यक्रमाची सुरूवात रितु रंजन मोहंती यांच्या गाण्याने झाली. त्यांनी एकापेक्षा एक अशी अनेक गाणी सादर केली. ‘दुरी’मधील गाण्याने रसिकांना भुरळ घातली. तर दर्शन रावल याने रॉकचा नमुना सुंदरवाडी महोत्सवात दाखवून दिला. मेरा फेटो निखलुगा... या गाण्यावर तर दर्शन रावल यांच्या सोबत युवाईची पावले थिरकली. सचिन गुप्ता व आक्सा सिंग यांनी बॉलिवूडमधील गाणी सादर केली. अनेक गाणी ही नव्या चित्रपटातील होती. त्यामुळे युवाईने चांगलीच दाद दिली. रसिकही गाण्यावर जल्लोष करताना दिसत होते. अनेक वेळा सुरक्षा रक्षकांना रसिकांना आवरणे कठीण झाले. दर्शन रावल यांनी रसिकांत येऊन आपली गाणी सादर केल्याने रसिकांतून आणखी उत्साह संचारला. अनेक वेळा प्रेक्षकांमधून गाण्याची फर्माईशही करण्यात येत होती. तब्बल अडीच तास चाललेल्या ‘रॉक स्टार अॅण्ड म्युझिकल नाईट’ला रसिकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादामुळे रॉक स्टारही चांगलेच भारावून गेले होते. (प्रतिनिधी) रसिकांच्या आग्रहाने रॉक स्टार पुन्हा स्टेजवर रसिकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादामुळे तसेच युवाई गाण्यावर चांगलीच थिरकल्याने हा कार्यक्रम संपूच नये, असे रसिकांना वाटत होते. तरीही रितु रंजन मोहती यांच्यासह दर्शन रावल यांनी शेवटचे गाणे म्हणून काढता पाय घेतला. मात्र, बराच वेळ स्टेजवर कोण न आल्याने रसिकांनी ‘वन्स मोर’चा नारा लावला. हा नारा बराच वेळ सुरू होता. अखेर कलाकार पुन्हा स्टेजवर आल्यानंतर रसिक शांत झाले.
‘इतवार कि शाम रॉक स्टार के नाम’
By admin | Published: February 23, 2016 12:04 AM