सुधीर राणे कणकवली : आशिये श्री दत्त क्षेत्र येथे आयोजित गंधर्व संगीत सभा पुणे येथील सानिका कुलकर्णी यांच्या दमदार,आश्वासक,तितक्याच अभ्यासपूर्ण गायनाने रंगली. वर्षा ऋतूच्या प्रारंभीच्या या गंधर्व संगीत सभेत रसिकांची मने अगदी चिंब झाली. रविवारची सायंकाळ संगीत रसिकांसाठी संस्मरणीय ठरली. निमित्त होते ते 30 व्या गंधर्व मासिक शास्त्रोक्त संगीत सभेचे.अभिजात शास्त्रोक्त संगीताचा सर्वत्र प्रसार व्हावा यासाठी येथील गंधर्व फाउंडेशनच्या वतीने दर महिन्याला गंधर्व संगीत सभा आशिये येथे आयोजित केली जाते. रविवारी रिमझिम पाऊस पडत होता. त्याच्या साक्षीने सानिका कुलकर्णी यांनी राग 'गावती'मधील ' बंदिश (मध्य व द्रुत लय) व तराणा सादर केला. त्यानंतर राग 'मियाँ मल्हार' व राग'बिहाग' मधील विदुषी डॉ. वीणा सहस्रबुध्दे यानी आडा चौतालातील लोकप्रिय केलेला तराणा सादर करून उपस्थित रसिकांना खिळवून ठेवले.त्यानंतर संजय कात्रे यानी घेतलेल्या मुलाखतीमध्ये सानिका कुलकर्णी यांनी प्रश्नांना अभ्यासपूर्ण उत्तरे दिली . तसेच आपला सांगितिक प्रवास उलगडला. त्यांचे वडिल, सुप्रसिद्ध सरोदवादक . पं. राजन कुलकर्णी यांचे मार्गदर्शन तसेच आईकडून गायिका होण्यासाठी मिळालेली प्रेरणा,गुरु डॉ. वीणा सहस्रबुध्दे यांची शिकवण, सखोल विचार, तालीम देण्याची पद्धत,पं. उदय भवाळकर यांची 'खर्ज' लावण्याची रियाज पद्धती, आयटीसी कलकत्ता इथे चालू असलेले व्यापक संगीत शिक्षण, तसेच पं. कुमार गंधर्व,गानसरस्वती किशोरीताई आमोणकर इत्यादींच्या लहानपणी ऐकलेल्या मैफिली,त्यातून मिळालेली प्रेरणा याबद्दल त्यांनी रसिकांशी मुक्त संवाद साधला.ही सभा सुबोध टिकले यांच्या स्मरणार्थ सुयोग टिकले व परिवार यानी पुरस्कृत केली होती. सुरूवातीला गायक व संगीत प्रचारक तसेच मासिक गंधर्व सभा सोशल मीडियाद्वारे देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचवणारे मयुर कुलकर्णी यांचे शरद सावंत यांनी,सानिका कुलकर्णी यांचे सुविधा टिकले यांनी, हार्मोनियमवादक वरद सोहनी (पं. विश्वनाथ कान्हेरे यांचे शिष्य) यांचे दामोदर खानोलकर यानी तर तबलावादक तनय रेगे(प्रवीण करकरे,पं.योगेश सम्सी यांचे शिष्य)यांचे बाळ नाडकर्णी यांनी स्वागत केले.कणकवलीतील संगीतप्रेमी भाजप नेते संदेश पारकर यांची उपस्थितीही लक्षणीय ठरली. त्यांचे विजयकुमार कात्रे यांनी स्वागत केले. संदेश पारकर यांनी गंधर्व मासिक संगीत सभा या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच उपक्रमास देणगीही दिली. तसेच त्यांचे मित्र सुबोध टिकले यांच्याबद्दल गौरवोद्गार काढत गतस्मृतिना उजाळा दिला. अशा संगीत कार्यक्रमांना आपले नेहमीच सहकार्य राहील अशी ग्वाही दिली. कणकवलीकर हे नेहमीच कलाकार आणि कलेचा सन्मान राखतात हि सुसंस्कृत परंपरा आपण सर्वांनी जोपासली पाहिजे आणि अशा सातत्यपूर्ण आणि विधायक उपक्रमातून कणकवलीचे नाव सर्वदूर झळकेल अशी आशा यावेळी प्रगट केली.सानिका कुलकर्णी यांनी आपल्या मैफिलिची सांगता पं. कुमार गंधर्व यानी गायलेल्या संत कबीर यांच्या भजनाने (निर्गुणी भजन)केली. वरद सोहनी आणि तनय रेगे यांची साथ विशेष दाद मिळवून गेली. बाबू गुरव यांनी ध्वनि व्यवस्था सांभाळली. मयुर कुलकर्णी यांनी प्रास्ताविक तर आभारप्रदर्शन संजय कात्रे यांनी मानले . ही गंधर्व संगीत सभा आयोजनासाठी अभय खडपकर,मनोज मेस्त्री,दामोदर खानोलकर,विलास खानोलकर,संतोष सुतार,किशोर सोगम,शामसुंदर सावंत, सागर महाडिक, संदीप पेंडुरकर, विजय घाटे, राजू करंबेळकर परिवार यांनी विशेष मेहनत घेतली.पुढील गंधर्व संगीत सभा २१ जुलै रोजी !या पुढील ३१ वी गंधर्व सभा २१ जुलै रोजी आदित्य आपटे यांच्या सरोद वादनाने सजणार आहे. सरोद हे दुर्मिळ वाद्य आहे. संगीत रसिकांनी या संधीचा आस्वाद घेण्यासाठी उपस्थित रहाण्याचे आवाहन गंधर्व फाऊंडेशनच्यावतीने यावेळी करण्यात आले
सानिका कुलकर्णी यांच्या गायनाने रसिक मने चिंब !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 1:19 PM
आशिये श्री दत्त क्षेत्र येथे आयोजित गंधर्व संगीत सभा पुणे येथील सानिका कुलकर्णी यांच्या दमदार,आश्वासक,तितक्याच अभ्यासपूर्ण गायनाने रंगली. वर्षा ऋतूच्या प्रारंभीच्या या गंधर्व संगीत सभेत रसिकांची मने अगदी चिंब झाली. रविवारची सायंकाळ संगीत रसिकांसाठी संस्मरणीय ठरली. निमित्त होते ते 30 व्या गंधर्व मासिक शास्त्रोक्त संगीत सभेचे.
ठळक मुद्देसानिका कुलकर्णी यांच्या गायनाने रसिक मने चिंब !आशिये येथे वर्षाॠतू आरंभी गंधर्व संगीत सभा