सिंधुदुर्ग : आमदार नितेश राणे यांना ६ फेब्रुवारी पर्यंत दिलासा असताना जिल्हा न्यायालयाबाहेर त्यांना अडवून पोलिसांनी गुन्हा केला होता. मात्र पोलिसांनी उलट निलेश राणे यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक कोणाच्यातरी दबावाखाली येऊन भाजप विरोधात वागत आहेत. मात्र आम्ही हे सहन करणार नाही असा इशारा भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी पत्रकार परिषदेत दिला.
येत्या दोन दिवसांत जिल्हा कार्यकारिणी बैठक घेऊन या विरोधात आंदोलन करण्याची दिशा ठरविणार आहोत असेही तेली यांनी यावेळी सांगितले. त्यापूर्वी भाजप शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांची भेट घेऊन सर्व वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली.१ जानेवारीला जिल्हा न्यायालयाबाहेर घडलेल्या घटनेनंतर पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले होते. त्याचा निषेध करण्यासाठी जिल्हाध्यक्ष राजन तेली व शिष्टमंडळ आज जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांना भेटले. यावेळी जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, अजित गोगटे, जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, बाबली वायंगणकर, दोडामार्ग नगरसेवक चेतन चव्हाण, सुहास गवंडळकर, ज्ञानेश्वर केळजी आदी उपस्थित होते.जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केल्यानंतर तेली यांनी पत्रकार परिषद घेत जिल्हा प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला आहे.