कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीवर चांगले, अभ्यासू उमदेवार निवडून जावेत, या दृष्टीकोनातून आम्ही प्रभाग क्र. ८ मधील अपक्ष उमेदवार इजाज नाईक यांना शिवसेना पक्षाचा बिनशर्त पाठिंबा देत असून, या प्रभाग क्र. ८ मस्जिद मोहल्लामधून शिवसेनेचे इम्रान करोल यांचा उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी दिली. प्रभाग क्र. ८ मधील अपक्ष उमेदवार इजाज नाईक यांना त्यांच्या घरी आमदार वैभव नाईक व शिवसेनेचे पदाधिकारी यांनी भेट घेत त्यांना बिनशर्त पाठिंबा दिला. यावेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना आमदार नाईक म्हणाले, कुडाळ नगरपंचायतीवर चांगले उमेदवार जाणे गरजेचे आहे. प्रभाग क्र. ८ मस्जिद मोहल्लामधून अपक्ष उमेदवार इजाज नाईक हे अभ्यासू व चांगले उमेदवार आहेत. ते या नगरपंचायतीवर असणे आवश्यक आहे. त्यामुळे येथील आमचे उमेदवार इम्रान करोल यांचा उमेदवारी अर्ज आम्ही मागे घेत असून, इजाज नाईक यांना बिनशर्त पाठिंबा देणार आहोत, असे सांगत आमदार नाईक यांनी इजाज नाईक यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अभय शिरसाट, तालुकाध्यक्ष राजन नाईक, बबन बोभाटे, युवा सेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, शिवसेनेचे उमेदवार इम्रान करोल, संजय पडते, सुशील चिंदरकर, गणेश भोगटे, तसेच फै य्याज करोल, अब्बास करोल, इम्तियाज करोल, अशर्फ नाईक, जहीर आडालकर, अरीफ खान, आरिफ करोल, शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी) मी अपक्षच राहणार : इजाज नाईक यावेळी बोलताना इजाज नाईक म्हणाले, उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी मला भाजप पक्षाकडून आॅफर आली होती. मात्र, त्या पक्षाचे आभार मानून मी त्यांना नकार दिला होता. शिवसेना आमदार वैभव नाईक व त्यांच्या कार्यकर्त्यांनी मला जो बिनशर्त पाठिंबा दिला, त्यांच्या भूमिकेचे मी समर्थन करतो. मात्र, मी आमच्या समाजबांधवांशी चर्चा करणार आहे. कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नसून, निवडून आल्यास अपक्ष म्हणूनच राहणार आहे, असे सांगितले.
अपक्ष उमेदवाराला शिवसेनेचा पाठिंबा
By admin | Published: April 03, 2016 11:14 PM