सिंधुदूर्ग - सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला योगदान ठरणाऱ्या चिपी विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचे उद्घाटन मंगळवारी (5 मार्च) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते करण्यात आले. साडेतीन किमीची धावपट्टी असलेल्या या विमानतळावर आंतरराष्ट्रीय विमान उतरवण्याची सुविधा आहे. त्यामुळे सिंधुदुर्गाच्या भविष्यातील पर्यटन वाढीस चालना मिळणार आहे.
सिंधुदुर्गमधील सीसीटीव्ही प्रकल्प, देवगडमधील पवन ऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण, चांदा ते बांदा योजनेतील कृषी यांत्रिकीकरण, एस. आर. ए, पशुसंवर्धन व पिंजरा शेती प्रकल्पातील लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे वाटप, पोलिसांना स्वत:च्या घरासाठी गृह कर्जाचे वितरण आदी कार्यक्रमही होणार आहेत. तसेच आयुष्यमान भारत, श्रमयोगी योजनेचा शुभारंभही होणार आहे. यावेळी महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरण व भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्यात सामंजस्य करार होणार असल्याची माहिती याआधी सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.
केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्यासह भाजपाचे व शिवसेनेचे पदाधिकारी, नेते उपस्थित आहेत. यापूर्वी गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर या विमानतळाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले होते. त्या ठिकाणी खासगी विमान उतरविण्यात आले होते. मात्र आज अधिकृतरित्या शासकीय उद्घाटन झाले आहे. चिपी विमानतळ जिल्ह्यातील लोकांसाठी मार्गदर्शक ठरणार असून, विकासाला चालना देणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात त्याचा फायदा निश्चितच येथील लोकांना होणार आहे.
औपचारिक उद्घाटनावेळी नारायण राणे यांनी जोरदार टीका केली होती. चिपी येथील विमानतळाचे उद्घाटन होत नाही, तर फक्त इमारतीचे उद्घाटन होत आहे. चिपी येथे विमान केव्हा उडेल याचा कोणताही थांगपत्ता नाही. तरीही शिवसेना भाजपाची मंडळी विमानतळाचे उद्घाटन करत असल्याचे सांगून जिल्हावासीयांची फसवणूक करीत आहेत अशी टीका खासदार नारायण राणे यांनी केली होती. महत्वाचे म्हणजे नारायण राणे आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आहेत.
चिपी विमानतळ टर्मिनल उदघाटन कार्यक्रमात पत्रकारांना अपमानास्पद वागणूक
चिपी विमानतळ टर्मिनल इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात पत्रकारांना अपमानास्पद वागणूक, पोलिसांकडून धक्काबुक्कीचा प्रकार घडला. त्यामुळे पत्रकारांनी तीव्र संताप व्यक्त करत याचा निषेध केला.
सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नागरी विमानोड्डान मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले. यावेळी गृह राज्य मंत्री दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांचे नाव न घेताच 'आम्ही नुसती उद्घाटने करत नाही तर काम करतो', असा टोला लगावला आहे. महत्वाचे म्हणजे या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री नारायण राणेही उपस्थित होते. सिंधुदुर्ग चिपी विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, उद्योगमंत्री सुभाष देसाई, महादेव जानकर, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, खासदार विनायक राऊत उपस्थित होते.