सावंतवाडी - केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री आणि अटल प्रतिष्ठानचे मार्गदर्शक सुरेश प्रभू यांच्या सहकार्याने अटल प्रतिष्ठानच्या सोलार ग्रीड प्रणालीसाठी ३ लाख रूपये मंजूर झाले असून त्याचे उद्घाटन ३० डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता अटल प्रतिष्ठान, माठेवाडा, सावंतवाडी येथे सुरेश प्रभू यांच्या हस्ते होणार आहे.
कार्यक्रमाला कोकण रेल्वेचे वरिष्ठ अभियंता कृष्णा लंबाणी उपस्थित राहणार आहेत. सोलार ग्रीड ही संकल्पना पर्यावरणपूरक असून त्यापासून सुमारे वर्षाला ३०० युनिट एवढी अपारंपरिक ऊर्जा तयार होणार आहे. ही ऊर्जा थर्मल पॉवरने निर्माण झाली असती तर त्यामुळे वर्षाला हवेमध्ये २८०० किलो एवढा कार्बन तयार झाला असता आणि प्रदूषण झाले असते. म्हणजेच या ग्रीड प्रणालीमुळे २८०० किलो एवढा कार्बन होण्यापासून वाचला. अशी ही पर्यावरणपूरक अपारंपरिक ऊर्जा निर्मितीची संकल्पना सुरेश प्रभू यांच्या सहकार्यातून अटल प्रतिष्ठानला मिळाली. याबद्दल अटल प्रतिष्ठानने त्यांचे आभार मानले आहेत.
याच कार्यक्रमात ‘शाश्वत विकासाची संकल्पना’ व ‘भारतीय रेल्वे : गती आणि प्रगती’ यावर खुली निबंध स्पर्धा घेण्यात आली होती. त्याचा पारितोषिक वितरण समारंभही होणार आहे. या दोन्ही कार्यक्रमांना उपस्थित रहावे, असे आवाहन अटल प्रतिष्ठानचे अध्यक्ष नकुल पार्सेकर, कार्यवाह डॉ. राजशेखर कार्लेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील जोशी यांनी केले आहे.