आॅनलाईन लोकमत सिंधुदुर्गनगरी दि. २२ : देशाच्या सर्वागिण विकासासाठी रेल्वेचा विकास अतिशय महत्वाचा आहे. रेल बढे-देश बढे हा कार्यक्रम घेऊन देशाअंतर्गंत रेल्वेचं जाळ विकसित करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. या अनुषंगानेच रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुखकर व विहित वेळेत व्हावा तसेच रेल्वे प्रवाशांना अत्याधुनिक सेवा मिळाव्यात यासाठी रेल्वे प्रशासनामार्फत सवोर्तोपरी प्रयत्न केले जात आहेत असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी कुडाळ रेल्वे स्थानकावर आयोजित समारंभात केले.कुडाळ रेल्वे स्थानकावर आयोजित कार्यक्रमात रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते कोकण रेल्वेच्या २८ स्थानकावर मोफत वाय-फाय सेवेचा तसेच कुडाळ व चिपळूण रेल्वे स्थानकारील विविध प्रवासी सुविधांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर खासदार विनायक राऊत, माजी आमदार राजन तेली, जि.प. सदस्य नागेंद्र परब, संजय फडते, काका कुडाळकर, माजी जि.प. अध्यक्ष संग्राम प्रभूगांवकर, अभय शिरसाट आदी उपस्थति होते.
४00 रेल्वे स्थानकाचे नुतनीकरण
रेल्वे प्रवाशांच्या दृष्टीने रेल्वे स्थानकांचे सुविधायुक्त नुतनीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आल्याचे सांगून श्री. प्रभू म्हणाले की, देशातील ४00 रेल्वे स्थानकांच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. आतापर्यंत रेल्वेचा सर्वंकष विकास आराखडा केला नव्हता. आता २0३0 सालापर्यंत देशाअंतर्गंत रेल्वेच माल वाहतुक व प्रवासी या दृष्टीकोनातून रेल्वे आराखडा तयार केला असून मुंबई, दिल्ली व कलकत्ता अशा मोठया महत्वाच्या रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी पहिल्या टप्यात साडेतीन लाख कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. किनारपट्टीतील प्रवाशांना तिकिट सुविधा मिळण्यासाठी किनारपट्टीवरील या मोठया शहरात तिकीट मिळण्याची सुविधा केली जाईल.
विकासाच्या दृष्टीने कोकण पश्चिम महाराष्ट्राला रेल्वेने जोडणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करुन प्रभू म्हणाले की, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्गाचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम वेगाने सुरु आहे. लघु उद्योग, छोटे व्यापारी यांना रातोरात प्रवास करुन शहराच्या ठिकाणी पोहचणे व परत आपल्या गावी येणे यासाठी युरो ट्रेनच्या धर्तीवर ट्रेन सुरु करण्याचा मानस आहे. यावेळी खासदार विनायक राऊत म्हणाले केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी कोकणातील विविध रेल्वे स्थानकांच नूतनीकरण अतिशय वेगात केले आहे. कोकण रेल्वेच्या प्रवाशांना यामुळे दिलासा मिळाला आहे. कोकण रेल्वेच्या काही प्रकल्पग्रस्तांना अद्याप रेल्वेच्या नोकरीत समाविष्ट केलेले नाही याबाबत त्यांनी विशेष लक्ष दयाव तसेच कुडाळ स्थानकातील छोटया वाहनांसाठी ओव्हर ब्रीजचे काम पूर्ण करावे अशी मागणी यावेळी केली.
प्रारंभी कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी प्रस्तावित २८ स्थानकातील वाय-फाय सुविधा तसेच कुडाळ व चिपळूण रेल्वे स्थानकात नवीन प्लॅटफॉर्म, बायो-टॉयलेट, अतिरिक्त कन्वेशनल शेल्टर, रस्ते सुविधा बाबत माहिती दिली. शेवटी विभागीय व्यवस्थापक बाबासाहेब निकम यांनी आभार मानले.