सावंतवाडी : सावंतवाडीतील मोती तलावाचे आकर्षण एवढे आहे की विदेशी पक्ष्यांनाही भुरळ पडते. या तलावात माशांचाही विपुल साठा आहे. अनेक पक्षी तलावात विहार करीत असतात. पक्ष्यांच्या विहाराची दृश्ये मनोहारी असतात. मात्र, अशा पक्ष्याच्या जीवावर एक साधा कपडा बेतू शकतो.
असाच प्रकार रविवारी सकाळी मोती तलावात घडला. मात्र, यातून हा पक्षी बालंबाल वाचला. अन्यथा त्याला प्राणच गमवावा लागला असता. या पक्ष्याच्या मानेभोवती अडकलेला कपडा अखेर स्थानिक वन्यप्रेमी व वनविभागाने सायंकाळी उशिरा काढला. त्यानंतर त्या पक्ष्याने आकाशात भ्रमण केले.
सावंतवाडीत पाण्याचा साठा विपुल प्रमाणात आहे. नगरपालिकाही चांगल्याप्रकारे पाणीपुरवठा करीत असते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून मोती तलावाची स्वच्छता झाली नसल्याने मोती तलावात अनेक कपडे तसेच वेगवेगळ्या वस्तू अडकून पडलेल्या असतात. काही पक्षी कपड्यात असणारे मासे खाण्याच्या प्रयत्नात टोच मारतात. तो कपडा त्यांच्या चोचीत अडकला जातो. त्यातील एक कापड असेच या विदेशी पक्ष्याच्या गळ्याभोवतीच गुंडाळले गेले होते.
हा सर्व प्रकार सामाजिक कार्यकर्ते राजू धारपवार यांनी पाहिला व त्यानंतर स्वत: राजू धारपवार यांच्यासह काही प्राणीमित्र आणि वनविभागाच्या मदतीने पक्ष्याच्या गळ्याभोवती अडकलेले कापड मोती तलावात उतरून काढण्यात आले. त्यानंतर या पक्ष्याने मोकळा श्वास घेतला आणि आकाशात भरारी घेतली.