देवगड : मच्छिमारी करताना जाळ्यात अडकलेल्या सुमारे २०० किलो वजनाच्या कासवाला तारामुंबरी येथील मच्छिमारांनी जीवदान दिले.तारामुंबरी येथील मच्छिमार अक्षय खवळे, दीपक खवळे, ज्ञानेश्वर सारंग, पंकज दुधवडकर व हितेश खवळे हे तारामुंबरी खाडीत शनिवारी दुपारी ३ वाजता मच्छिमारी करीत असताना त्यांचा जाळ्यात महाकाय कासव अडकला. त्यांनी हे होडीत घेऊन जाळ्यातून त्याची प्रथम सुटका केली. त्यानंतर त्याला तारामुंबरी खाडीकिनारी आणले.त्या कासवाला टेम्पोतून तारामुंबरी समुद्रात सोडण्यात आले.
वन्यजीव अभ्यासक प्रा. नागेश दप्तरदार यांनी तो कासव ग्रीन टर्टल जातीचा असून समुद्रातील कासवे खाडीमध्ये शेवाळ, जेलिफिश या खाद्यासाठी जातात असे सांगितले. हे महाकाय कासव ४ फूट लांबीचे व अडीच फूट रुंदीचे होते. कासव समुद्रात सोडताना लक्ष्मण तारी, भाई नरे, सागर सुरक्षा रक्षक सुदेश नारकर, अमित बांदकर आदी उपस्थित होते.