सावंतवाडी : पंढरपूर येथील मुकादम सुशांत अरूण खिल्लारे यांचा मृत्यू भाऊसो माने व तुषार पवार यांनी पट्याने व काठीने मारहाण केल्यानेच झाला. दहा दिवस माने याने खिल्लारे याला आपल्या घरात ठेवले असल्याचे पोलिस तपासात पुढे आले. या प्रकरणात आरोपींनी वापरलेली गाडीही मंगळवारी रात्री उशिरा पोलीसांनी जप्त केली असल्याचे पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी सांगितले.वीटभट्टी चालवण्यासाठी कऱ्हाड येथील भाऊसो माने यांनी पंढरपूर येथील सुशांत अरूण खिल्लारे याला साडेतीन लाख रूपये दिले होते. ते पैसे वसूल करण्यासाठी दहा दिवसापूर्वीच खिल्लारे याला माने व पवार यांनी पंढरपूर येथून कऱ्हाड येथे आणले होते. जो पर्यंत पैसे देत नाही तो पर्यंत सोडणार नाही असा पवित्रा माने याने घेतला होता. त्यातच रविवारी दारूच्या नशेत माने व पवार यांनी खिल्लारे याला बेल्ट व काठीने बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत खिल्लारे यांचा मृत्यू झाला. त्यानंतर सोमवारी सकाळी पवार यांच्या कार मधून खिल्लारे यांचा मृतदेह आंबोली येथे आणण्यात आला व तो रात्री च्या सुमारास गाड्याची वर्दळ नसल्याचे बघून घाटात टाकण्यात आला. मात्र यावेळी मृतदेह टाकताना भाऊसो माने हा पाय घसरून दरीत कोसळला आणि त्याचा ही मृत्यू झाला.ही घटना मंगळवारी उघडकीस आल्यानंतर यातील तिसरा संशयित तुषार पवार यांची पोलीस कसून चौकशी करीत असून पवार यांच्या चौकशीत विसंगती आढळून येत आहे. खिल्लारे याचे नातेवाईक सावंतवाडीत आल्यानंतर रितसर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. नंतरच गुन्ह्यातील मुद्देमाल ताब्यात घेण्यात येईल असे पोलिसांकडून स्पष्ट केले.
मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात आंबोली घाटात खिल्लारेचा मृतदेह टाकतना पाय घसरून पडलेल्या भाऊसो माने यांचा मृतदेहाचे शवविच्छेदन येथील उपजिल्हयात रूग्णालयात केल्यानंतर त्यांच्या कऱ्हाड येथील नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आला मात्र खिल्लारे याचे नातेवाईक पंढरपूर येथून बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत पोचले नसल्याने त्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले नव्हते.गुन्ह्यात आणखी आरोपी वाढणार खिल्लारे खुन प्रकरणात सध्या तरी एकाचा समावेश आहे.तर दुसरा आरोपी मृत पावला मात्र खिल्लारे याला दहा दिवसापूर्वी माने याने कऱ्हाड येथे आणून ठेवले होते.त्यामुळे यात आणखी कोणाचा समावेश आहे का हे पोलीस आता तपासणार आहेत