कणकवली : शिवसेना प्रवेशासाठी दरवाजे उघडे आहेत असे मला सांगणाऱ्या विरोधी गटनेते सुशांत नाईक यांनी त्यांचे दरवाजे वेळीच घट्ट बंद करावेत. मी कट्टर राणेसमर्थक असून भाजपचा नगराध्यक्ष आहे. त्यामुळे जनतेत विनाकारण संभ्रम पसरवून शिवसेनेत आपले वजन वाढविण्याचा नाईक यांनी प्रयत्न करू नये असा टोला कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सुशांत नाईक यांना लगावला आहे.कणकवली येथील नगरपंचायत कार्यालयातील नगराध्यक्ष दालनात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत समीर नलावडे बोलत होते. ते म्हणाले की , कणकवली शहरात जनतेमध्ये व कणकवलीच्या राजकारणामध्ये माझ्याबद्दल संभ्रम निर्माण करून आपले वजन वाढवण्याचा सुशांत नाईक यांचा प्रयत्न आहे.मी माझ्या भूमिकेशी कायम ठामच आहे. दबाव व दडपण हे शब्द माझ्या डिक्शनरी मध्ये नाहीत. नाईक यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजी मार्केट विषयावर न बोलता माझ्या भूमिकेबाबत ते बोलले. त्यामुळे त्यांनी त्यांची व्यावसायिक भूमिका तपासून पाहावी.सुशांत नाईक यांनी भाजी मार्केट नगरपंचायतने विकसित करावे. अशी भूमिका मांडली आहे. ती भूमिका त्यांनी आपल्या पालकमंत्र्यांमार्फत निधी आणून पूर्ण करावी. केवळ तोंडाच्या बाता मारून आरक्षणे विकसित होत नाहीत. माजी मुख्यमंत्री नारायण राणे , आमदार नितेश राणे व भाजपा पक्षाचा मी कट्टर कार्यकर्ता आहे. तसेच माझ्या पक्षाशी मी ठाम आहे.त्यामुळे नाईक यांनी आपले दरवाजे घट्ट बंद करून ठेवावेत. अन्यथा त्यांच्याकडचे सगळे बाहेर येऊन त्यांचे घर रिकामे होईल. जानेवारी रोजीच्या नगरपंचायत बैठकीत भाजी मार्केट बाबत मी भूमिका मांडली. ती मुख्याधिकारी व प्रशासनाला समजली आहे. यामुळे भाजी मार्केट या विषयासंदर्भात पुन्हा मला भूमिका मांडण्याची आवश्यकता नसल्याचे नलावडे यांनी यावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. तसेच फौजदारी गुन्हा दाखल करणे हे काम मुख्याधिकाऱ्यांचे असते असेही ते म्हणाले.राजन तेली व माझ्यात पक्षीय वाद नाहीत . मला नगरपंचायतच्या हिताचे जे विषय वाटले ते मी मांडले. त्यामुळे नारायण राणे , नितेश राणे ज्या पक्षात असतील त्या पक्षाचा मी कार्यकर्ता असेन. असेही समीर नलावडे यांनी यावेळी सांगितले. भालचंद्र महाराज संस्थान शेडच्या भूमीपूजनाच्यावेळी आम्ही भाजपा प्रदेश सचिव निलेश राणे यांच्या स्वागतासाठी नियोजन करत असल्यामुळे त्या शुभारंभाच्या कार्यक्रमाला जाता आले नाही. मात्र नगरपंचायतने या शेडसाठी ना हरकत दिली आहे.
या कामाचा प्लान पुन्हा रिव्हाईज झाला आहे. तो देखील कायद्यात बसवून परवानगी दिली आहे. त्यामुळे या संस्थांनला आम्ही सर्वतोपरी मदत करणार आहोत. तसेच जर भाजी मार्केट विकासकाच्या विरोधात मुख्याधिकार्यांनी कायद्यानुसार कारवाई केली तर याप्रश्नी कुणालाच पाठीशी घालण्याचा प्रश्नच येत नाही. कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे मुख्य अधिकाऱ्यांचे अधिकार आहेत असेही नलावडे यांनी यावेळी स्पष्ट केले.