कणकवली: ठाकरे शिवसेनेतील युवा सेनेचे आठ तालुक्यांचे जिल्हाप्रमुख होवू न शकलेल्या सुशांत नाईक यांनी आमदार नितेश राणे यांना प्रश्न विचारून लहान तोंडी मोठा घास घेऊ नये. कार्यतत्पर असलेले आमदार कणकवली विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र, जिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी खासदार असलेले विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांचीही आहे. त्यांनी आतापर्यंत दिलेली आश्वासने पूर्ण केली का? त्यांनी कोणती विकासकामे केली? याबाबत सुशांत नाईक यांनी जनतेला आधी उत्तर द्यावे असा टोला भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांनी लगावला आहे. सुशांत नाईक यांनी आमदार राणे यांच्यावर टीका केली होती. त्याला संदीप मेस्त्री यांनी प्रत्युत्तर दिले. कणकवली शहर भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी युवा मोर्चा जिल्हा सचिव संतोष उर्फ पप्पू पुजारे, जिल्हा सदस्य सर्वेश दळवी, तालुकाध्यक्ष गणेश तळगावकर, शहराध्यक्ष सागर राणे, तालुकाप्रमुख प्रज्वल वर्दम आदी पदाधिकारी उपस्थित होते.मेस्त्री म्हणाले, आमदार वैभव नाईक यांचे फार्मसी कॉलेज, पेट्रोल पंप आहेत. त्यांनी आपल्या कॉलेजमध्ये चार गरीब मुलांना मोफत शिक्षण द्यावे. त्यानंतर राणे कुटुंबियांवर टीका करावी. राणे कुटुंबीयांनी जनतेसाठी जे उपक्रम आतापर्यंत राबविले. ते स्वखर्चाने केले आहेत. कोणत्या ठेकेदाराच्या खिशातून तिथे पैसे जात नव्हते. आमदार राणे यांच्या प्रयत्नातून दोन कोटी रुपयांचा निधी देवगड बसस्थानकासाठी तर विजयदुर्ग बस स्थानकासाठी ८० लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे. केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून विविध योजनांचा शेकडो तरुण लाभ घेत आहेत. त्याबाबतची आकडेवारी पुढच्यावेळी मी सांगेन. राणेच जिल्ह्याचा विकास करू शकताततुमचे नेते संदेश पारकर, अतुल रावराणे, सतीश सावंत यांना राणे कुटुंबियांकडून तसेच भाजपकडून अपेक्षा जास्त आहेत. कारण त्यांना जाणीव आहे की राणेच जिल्ह्याचा विकास करू शकतात. वरवडे आरोग्य केंद्राचा प्रश्न उपस्थित करणाऱ्या नाईक यांचे बंधू वैभव नाईकांचे मित्रच ९ वर्षे आरोग्य मंत्री होते. त्यावेळी ते काम का केले नाही? ..तर घरगुती गॅस सिलिंडर अर्ध्या किमतीत द्यावासुशांत नाईक यांना जनतेचा एवढाच कळवळा असेल तर त्यांनी आपल्या प्रभागातील महिलांना आपल्या एजन्सीच्या माध्यमातून घरगुती गॅस सिलिंडर अर्ध्या किमतीत द्यावा. मराठा मंडळबाबत प्रश्न विचारणाऱ्या नाईक यांनी विष्णू शंकर नाईक हे कोण आहेत? ते विश्वस्त असताना सभागृहाचे काम अपूर्ण का राहिले? हे उत्तर द्यावे. नाईक यांच्या प्रश्नांची आमदार राणे यांनी उत्तरे द्यायची गरजच नाही. 'होऊ द्या चर्चा' कार्यक्रमाला मला आमंत्रण द्या. मी एकटाच तिथे येईन. मग आपण चर्चा करू.
लहान तोंडी मोठा घास घेऊ नका, संदीप मेस्त्री यांचे सुशांत नाईकांना प्रत्युत्तर
By सुधीर राणे | Published: October 06, 2023 3:52 PM