कणकवली : हॉटेलमध्ये एकत्र बसलेले असतानाच शाळकरी मुलाचा मोबाईल चोरल्याबाबत गुन्हा दाखल असलेल्या किशोर अंकुश मडव (३६ रा. जांभवडे - देऊळवाडी) याला कणकवली पोलिसांनी कणकवली - बाजारपेठ येथे अटक केली. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक जगदिश बांगर व कॉन्स्टेबल वैभव कोळी यांनी केली. ही चोरीची घटना २७ सप्टेंबरला घडली होती.याबाबत तक्रार १६ वर्षीय मुलानेच पोलिसांत दिली होती. त्यानुसार हा मुलगा गावातीलच एकाच्या चारचाकीने कणकवलीला आला होता. त्यावेळी त्यांच्यासमवेत संशयीत किशोर मडव व अन्य एकजण होता. येथे एका ठिकाणी डिश टिव्हीच्या सेटटॉप बॉक्सची वायर घेऊन मुलगा, सोबतचे तिघे व त्यांना कणकवलीत मिळालेला अन्य एक असे पाचहीजण दुपारी १२ च्या सुमारास सह्याद्री हॉटेलमध्ये आले. येथील एका टेबलावर ते बसले होते. पुढे खाणे - पिणे झाल्यानंतर एकजण काऊंटरवर बिल देण्यासाठी गेला असता हा मुलगाही त्याच्या मागोमाग गेला.त्यावेळी त्याने मोबाईल टेबलावरच ठेवला होता. त्यांच्यापैकी करंदीकर बिल देत असतानाच संशयीत किशोर मडव तेथून उठून गेला. त्यानंतर मुलाने टेबलावर पाहिले असता मोबाईल चोरीस गेल्याचे लक्षात आले. विचारणा केली असता उपस्थितांपैकी सर्वांनीच आपण मोबाईल घेतला नसल्याचे सांगितले.
दरम्यान, दुसऱ्या दिवशी मुलाने पुन्हा सह्याद्री हॉटेल गाठले. यावेळी सीसीटीव्हीमध्ये किशोरनेच मोबाईल चोरल्याचे दिसून आले. अखेर मुलाने पोलीस ठाणे गाठत त्याच्याविरोधात तक्रार दिली. मात्र, संशयिताला याची कुणकुण लागल्याने तो पसार झाला होता.