सावंतवाडी : आरोंदा जेटीच्या कामाला उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती अखेर आज, शुक्रवारी उठवली. त्यामुळे बंदराचे काम करण्यास आता कंपनीला मुभा मिळणार आहे. या प्रकरणाची सुनावणी आता चार आठवड्यांनी होणार आहे.याबाबतची माहिती अशी की, माजी आमदार परशुराम उपरकर यांनी, आरोंदा बंदर कंपनीच्या विरोधात न्यायालयाचा बंदी आदेश डावलून काम करीत असल्याची याचिका दाखल केली होती. या याचिकेवर दोन वेळा सुनावणी झाली व दोन्ही वेळा बंदर कंपनीला काम करण्यास मज्जाव करीत स्थागिती दिली गेली होती. या प्रकरणावर आज, शुक्रवारी उच्च न्यायालयातील खंडपीठाकडे सुनावणी झाली. तब्बल दोन तास चाललेल्या सुनावणीनंतर उच्च न्यायालयाने आरोंदा जेटी कंपनीवरची बंदी उठवत असल्याचे जाहीर केले.तसेच याप्रकरणी चार आठवड्यांनी सुनावणी घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. याबाबतची माहिती याचिकाकर्ते माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिली असून, हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयातही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, उच्च न्यायालयाने बंदी उठवल्याने आरोंदा बंदर कंपनीला आपले काम करता येणार आहे. गेले काही दिवस बंदर कंपनीने रस्ता अडवल्याच्या मुद्द्यावरून भाजप वगळता इतर पक्षांनी माजी आमदार राजन तेली यांना घेरले असून, भिंत हटविल्याशिवाय काम करू देणार नाही, असा पवित्रा घेतला आहे. (प्रतिनिधी)
आरोंदा जेटीवरची स्थगिती उठली
By admin | Published: January 16, 2015 11:09 PM