कणकवली : घोणसरी, पिंपळवाडी येथील ठेकेदार संजय जगन्नाथ पडवळ (वय ४८) यांचा मृतदेह सोमवारी दुपारी गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला. पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली असली, तरी नातेवाइकांनी घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. अमित गोपाळ राणे (रा. हरकुळ खुर्द) यांनी या घटनेची माहिती पोलिसांत दिली. रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास संजय पडवळ यांना मोबाईलवर कॉल आला. फोनवर कुर्ली वसाहतीमधील नळयोजनेचा पंप जळाला असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पडवळ दुचाकीवरून तेथे जाण्यास घराबाहेर पडले. त्यानंतर ते घरी परतले नाहीत. शोधाशोध केल्यानंतर सोमवारी दुपारी साडेतीन वाजता लोरे नं. १ येथील तलावानजीक झाडाच्या फांदीला नायलॉन दोरीने गळफास लावलेल्या स्थितीत पडवळ यांचा मृतदेह आढळून आला. याच ठिकाणी पडवळ यांचे कामही सुरू होते. घटनास्थळानजीक पडवळ यांचे सीमकार्ड मोबाईलमधून काढून टाकण्यात आले होते. एकंदर स्थितीवरून नातेवाइकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी सायंकाळी कणकवलीतील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. पडवळ यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. (प्रतिनिधी)
ठेकेदार संजय पडवळ यांचा संशयास्पद मृत्यू
By admin | Published: April 14, 2015 1:08 AM