देवगड (सिंधुदुर्ग) : विजयदूर्ग समुद्रात हजारोंच्या संख्येने शेळ्यांची वाहतूक करणारी आखाती देशात जाणारे संशयास्पद जहाज सापडल्याने खळबळ उडाली मात्र पोलिस यंत्रणेने या नौकेवर जहाजावर संशयास्पद काहीही आढळले नसल्याचे व सर्व परवानग्या घेवून हे जहाज विजयदूर्ग बंदरात आले होते. हे जहाज गुरूवारी सकाळी शेळ्या घेवून गुजरात येथे रवाना झाल्याचे सांगितले.
विजयदूर्ग किल्ल्यासमोर समुद्रात मंगळवारी एक संशयास्पद जहाज दिसले. हाजी अली येथील हे जहाज हजारोंच्या संख्येने शेळ्यांची वाहतूक करून इराणमध्ये घेवून जात असून या नौकेवर पाकीस्तानी नागरिक असल्याची चर्चा सोशल मिडीयावर सुरू होती. मात्र पोलिस यंत्रणेने ही अफवा असल्याचे सांगितले असून पोलिस, बंदर, कस्टम विभागाने याबाबत माहिती घेतली.
हे जहाज बुधवारी सायंकाळी विजयदूर्ग जेटी येथे लावण्यात आले होते. या जहाजाची तपासणी केली असता संशयास्पद काहीही आढळले नसून सर्व परवानग्या घेवून आलेले हे जहाज होते. गुरूवारी सकाळी शेळ्या घेवून हे जहाज गुजरात येथे रवाना झाल्याचे पोलिस विभागाने सांगितले. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिस विभागाने केले आहे.