कणकवली : पावसाअभावी चिंताग्रस्त झालेल्या शेतकरीवर्गाला गेले दोन दिवस पडणाऱ्या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. १ जुलैपासून पावसाने हजेरी लावल्यामुळे सिंधुदुर्गवासीय सुखावले आहेत. जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत नसला तरी भातशेतीसाठी आवश्यक असा पाऊस पडत आहे. आज, सोमवारी दिवसभर कणकवली शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाची संततधार सुरू होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यात १५ ते ३० जून या कालावधीत कडक ऊन पडल्यामुळे दुष्काळ पडणार की काय, अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र, १ जुलैपासून जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक प्रमाणात पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. कणकवली शहरासह तालुक्यात गेले दोन दिवस पावसाची संततधार सुरू आहे. भातशेतीसाठी आवश्यक असा पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. सावंतवाडीसह अन्य तालुक्यांतही आज सकाळपासून तुरळक प्रमाणात पाऊस झाला. (वार्ताहर)
पावसाची संततधार
By admin | Published: July 08, 2014 12:37 AM