रत्नागिरी : रत्नागिरी पर्यटन महोत्सवाची सांगता युवावर्गाचा लाडका गायक स्वप्नील बांदोडकर आणि बेला शेंडे यांच्या कार्यक्रमांनी झाली. या कार्यक्रमात सादर झालेल्या सर्व लोकप्रिय गाण्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. येथील गोगटे - जोगळेकर महाविद्यालयात पर्यटन महोत्सवाचा समारोप करण्यात आला. रोहित राऊत, सावनी रवींद्र यांच्या गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सुरूवात स्वप्नील बांदोडकर याच्या ‘गणाधिशा भालचंद्रा’ या गणेशस्तुतीने झाली. रंगमंचावर आगमन होताच श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटातच त्याचे स्वागत केले. रत्नागिरीची नात असलेल्या आणि सध्या गाजत असलेल्या ‘होणार सून मी...’ या मालिकेतील गाणी म्हटलेली सावनी रवींद्र हिने ‘नवरी आली’ हे लोकप्रिय गीत सादर केले. तिने कमला मालिकेचे शीर्षकगीत सादर केले. ‘झुमका गिरा रे’ या गाण्याला उपस्थितांनी चांगलाच प्रतिसाद दिला. स्वप्नीलच्या ‘गालावर खळी...’ आणि ‘राधा ही बावरी’ या गाण्यांना प्रेक्षकांमधून प्रतिसाद न मिळता तरच नवल. ‘सजन अलबेला’ या गाण्याने शास्त्रीय संगीतप्रेमींना वेगळा आनंद दिला. त्याने असंभव, सारेगमप या कार्यक्रमासाठी गायलेली शीर्षकगीते सादर केली. रोहित राऊत यानेही दुनियादारी या प्रसिद्ध मराठी चित्रपटातील ‘यारी यारी’ हे गीत सादर करताना युवावर्गाने उचलून धरले. बेला शेंडे हिने नटरंग चित्रपटातील ‘अप्सरा आली...’ या गाण्याने अधिक उत्साह निर्माण केला. त्यानंतर याच चित्रपटातील ‘दही दूध लोणी’ ही गवळण सादर केली. स्वप्नील बांदोडकर याला साथ देत ‘मला वेड लागले’ (टाईमपास) हे गीत सादर केले. ‘मला जाऊ द्या ना घरी’ या तिच्या आर्जवी स्वरातील लावणीने प्रेक्षकांना ताल धरायला लावला. (प्रतिनिधी)
स्वप्नील बांदोडकर, बेला शेंडे यांच्या सुरांनी श्रोते मंत्रमुग्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2015 10:15 PM